वांग्यांला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:06+5:302021-03-13T05:03:06+5:30
मेहकर तालुक्यातील कोराडी व पेनटाकळी प्रकल्प यासह तालुक्यातील इतर छोटे-मोठे तलाव पाण्याने १०० टक्के भरले आहेत. यामुळे जमिनीतील पाण्याची ...
मेहकर तालुक्यातील कोराडी व पेनटाकळी प्रकल्प यासह तालुक्यातील इतर छोटे-मोठे तलाव पाण्याने १०० टक्के भरले आहेत. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी ही संतुलित असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हंगामी फळबागासह भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यामध्ये कोबी, वांगी, टमाटा, मेथी, पालक यांसारख्या विविध भाजीपाल्याची लागवड केली आहे. गत वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळपिके विकण्यासाठी तारांबळ उडाली होती. काही कालावधीनंतर लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यावेळेस शेतकऱ्यांना भाजीपाला स्वतः विकण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी समोर येऊन स्वतः फळपिके व भाजीपाला विक्री करून होणारे नुकसान काही प्रमाणात टाळले. मात्र आता परत कोरोनाविषाणू रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात काहीअंशी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याचा थेट फटका भाजीपाला व फळपिके उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आंध्रुड परिसरातील पंढरी वामनराव देशमुख व गजानन हसनराव देशमुख यांनी वांगी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती. उत्पादन चांगल्या प्रमाणात निघत होते. मात्र आठवडी बाजार बंद झाल्याने आणि भाजीपाला हराशी काही अंशी बंद करण्यात आल्याने वांग्यांना भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे सध्या वांगी शेतातच पडून आहेत. यामुळे लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.
शेतमाल विक्रीस अडचणी
मागील वर्षी लाॅकडाऊन झाले होते. त्या मध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला, फळपिके विकण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी सहकार्य केले होते. मात्र सद्य:परिस्थितीत कृषी विभागाने पुन्हा या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा शेतमाल विक्री करण्याकरिता साहाय्य करणे गरजेचे आहे.