शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव; प्रशासन चांगलेच हादरले
By निलेश जोशी | Published: October 30, 2023 05:52 PM2023-10-30T17:52:50+5:302023-10-30T17:53:00+5:30
सक्तीची वीज देयक वसुली थांबवावी : आ. संजय गायकवाड यांचा इशारा
बुलढाणा : वीज देयकांची सक्तीची वसुली थांबविण्यासह वीज रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी केल्या जाणाऱ्या अवाजवी पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके व अन्य सहकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आ. संजय गायकवाड व शेतकऱ्यांनी अनपेक्षित धडक महावितरणच्या कार्यालयावर दिल्याने प्रशासनही चांगलेच हादरले होते.
यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस जिल्ह्यात पडलेला असतानाच शेतकरी रब्बीची कशीबशी जुळवाजुळव करत आहे. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी देयक देण्यात येत असून त्यांच्याकडून सक्तीने वीज देयकांची वसुली केली जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे वीज रोहित्रही मोठ्या प्रमाणावर जळत असून वीज रोहित्र वेळेत दुरुस्त करून मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अयोग्य वागणूक मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला होता. परिणामी, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या कार्यालयावर ही धडक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजीही केली.
शेतकरी हित महत्त्वाचे : गायकवाड
राज्यात आमच्या पक्षाचे सरकार असले तरी शेतकरी हितासाठी आपण कुठलीही तडजोड करत नाही. महावितरणने शेती व शेतकऱ्यांसंदर्भात चालवलेल्या अंदाधुंद कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरिपाच्या तोंडावर वीज रोहित्र जळाल्याने वेळेत वीजपुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम बुलढाणा व मोताळा तालुक्यात अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी हिताची कामे महावितरणने आठ दिवसांमध्ये मार्गी लावावीत, असा अल्टिमेटमच आ. गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांना दिला. यावेळी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे युवा नेते मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, संदीप गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते.
साडेचार कोटींचा निधी उपलब्ध
महावितरणकडे आ. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेला साडेचार कोटींचा निधी वर्तमान स्थिती उपलब्ध आहे. त्यामुळे बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्यासंदर्भातील समस्या त्वरेने मार्गी लावण्यात याव्या, असे आ. गायकवाड यांनी स्पष्टपणे निर्देशित केले. डीपीसीमधूनही महावितरणला ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
कोथळी प्रकरणाची चौकशी करणार
कोथळी येथे गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी पैसे देऊनही शेतकऱ्यांना अधिकृत वीजपुरवठा केला जात नाही. या गंभीर प्रकाराची पोलखोल आ. संजय गायकवाड यांनी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्याशी चर्चा करताना केली. त्याअनुषंगाने या प्रकरणात खोलात जाऊन आपण चौकशी करू, असेही कटके यांनी यावेळी सांगितले.