बोरखेड परिसरातील शेतकर्यांनी उभ्या सोयाबीनमध्ये घातली मेंढरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:00 AM2017-10-30T00:00:24+5:302017-10-30T00:01:41+5:30
बोरखेड: परिसरातील शेतकर्यांना सोयाबीनचे पीक तयार करणे परवडत नसून, नाइलाजास्तव काही शेतकर्यांनी उभ्या सोयाबीनच्या शेतात मेंढरे चारून रोटर मारणे चालू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरखेड: परिसरातील शेतकर्यांना सोयाबीनचे पीक तयार करणे परवडत नसून, नाइलाजास्तव काही शेतकर्यांनी उभ्या सोयाबीनच्या शेतात मेंढरे चारून रोटर मारणे चालू केले आहे.
यावर्षी वातावरणातील दोषामुळे सोयाबीनच्या झाडांना योग्य प्रमाणात शेंगा धरल्या नाहीत. तसेच मोठय़ा प्रमाणात शेंगा पोकळ राहिल्या. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, पलसोडा, सगोडा, पिंगळी, सायखेड, दानापूर या भागात सोयाबीनचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. आज रोजी मजुरांकडून सोयाबीन सोंगण्याचे एकरी १,३00 रुपये व मशीनने काढणे एकरी १,२00 रुपये अशी मजुरी आहे. अशातच हार्वेस्टरने तयार करणे १,५00 रुपये एकरी दर चालू आहे व सोयाबीनचे एकरी उत्पादन जवळपास १ ते २ क्विंटलवर थबकले. नाइलाजाने तयार केलेले सोयाबीन शेतकर्यांना विकणेच आहे. अशातच व्यापार्यांनी सोयाबीनचे बारीक दाणे व ओलसरपणाचे कारण देत १६00 ते २२00 रुपये प्रति क्विंटलने खरेदी चालू केली आहे. यापुढे दैनंदिन घरखर्च, लोकांचे देणे व मुलांचा शैक्षणिक खर्च कसा चालवावा, या विवंचनेत सोयाबीन उत्पादक शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उभ्या सोयाबीनमध्ये मेंढरे घातल्याचे दिसून येत आहे. तरी त्वरित शासनाकडून सोयाबीन पीक विमा मंजूर करून मदत मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.