बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्यांचा फलोत्पादन अभियानाकडे कल वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:54 PM2017-12-20T23:54:41+5:302017-12-20T23:56:52+5:30
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी हॉर्टनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात अमरावती विभागातून बुलडाणा हा अव्वल असून, राज्यातून चवथ्या क्रमांकावर आहे.
लोकमत विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी हॉर्टनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात अमरावती विभागातून बुलडाणा हा अव्वल असून, राज्यातून चवथ्या क्रमांकावर आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सन २0१७-१८ या वर्षाकरिता आजपर्यंत एकूण ५ हजार ५00 शेतकर्यांनी या हार्टनेट प्रणालीचा अर्ज भरण्यासाठी उपयोग केलेला आहे.
या ऑनलाइन पद्धतीमध्ये शेतकरी स्वत: किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या विविध घटकांचे अर्ज भरु शकतात. हा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ओळखपत्रासह सदर अर्ज कागदपत्रासह तीन प्रतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो. यानंतर या अर्जाची पुढील सर्व प्रगती ऑनलाइन पद्धतीने होत राहते. अर्ज रखडला कुठे, का रखडला, हे कळते. शिवाय अनुदान मंजूर झाल्यानंतर ते थेट लाभार्थी शेतकर्यांच्या बॅंक खात्यात जमा होते. यामुळे शेतकर्यांच्या प्रस्तावास होणारा व अनुदानासाठी होणारा विलंब या दोन्ही बाबीमध्ये तत्काळ कार्यवाही होणार असल्यामुळे याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे, कांदा चाळ, फलोत्पादन यांत्रिकीकरण अंतर्गत २0 एच.पी.ट्रॅक्टर, शेडनेट हाडव, पॉलीहाऊस काही घटकासाठी शेतकरी अर्ज करीत आहेत.
शेतकर्यांना मिळतो लाभ क्रमांक
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा योजनेच्या लाभासाठी प्रथम अर्ज करताना संकेतस्थळावर शेतकर्यांची नोंदणी केली जाते. यात वैयक्तिक, पिकाविषयीची व इतर माहिती नोंदवली जाते. यानंतर सदर शेतकर्याला भ्रमणध्वनीवर एक लाभधारक खाते क्रमांक दिला जातो. या क्रमांकाचे खाते उघडून शेतकर्याला योजनेचा अर्ज भरणे, अर्जाची प्रगती पाहणे यासारखा प्रक्रिया करता येतात.
काय आहे हॉर्टनेट प्रणाली
या अभियानाची केंद्रीय विभागामार्फत हॉर्टनेट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यात राज्यांच्या नावांची यादी आहे. त्यातील महाराष्ट्र या शब्दावर क्लिक केल्यावर महाराष्ट्राचे संकेतस्थळ खुले होते. यावर प्राथमिक माहिती जसे ओळखपत्र क्रमांक, आधार क्रमांक, बचत खाते क्रमांक, पॅन क्रमांक, शेतीचा गट क्रमांक, ८ अ चे क्षेत्र आदी स्वरुपात भरली जाते. त्यानुसार अर्ज दाखल करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतची सर्व कार्यवाही ही याच हॉर्टनेट प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
हॉर्टनेट ही सुविधा शेतकर्यांसाठी अतिशय सोईस्कर आहे. शिवाय फलोत्पादन अभियानातील योजनेच्या लाभासाठी शेतकर्यांनी या प्रणालीमार्फत अर्ज करणे बंधनकारक आहे. तेव्हा शेतकर्यांनी या प्रणालीमार्फत कृषी विभागात अर्ज करणे आवश्यक असून, शेतकर्यांनी फलोत्पादन अभियानातील योजनेचा लाभ घ्यावा.
- प्रमोद लहाळे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा