कांद्याचा दर घसरल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:53+5:302021-03-16T04:33:53+5:30
धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतो आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे ...
धामणगांव धाड : कांदा बाजारात येताच दर पडतो आणि शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे अजूनही शेतकऱ्यांना उमजले नाही. अशातच यावर्षी कांदा बियाण्याचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला. त्यात आता कांद्याचा दर घसरल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
कापूस, तेलबिया व ज्वारी हे मुख्य पीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकाचे होणारे नुकसान, बाजारपेठेत मिळणारा कमी दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो. तरीही यंदा चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कांदा लागवड करतात. यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. मात्र, जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात कांदा आला, तेव्हा शासनाने निर्यातबंदी केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणे कठीण झाले. सोबतच यावर्षी कांदा बियाणेही महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांदा बियाण्याच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले. परिणामी, कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली. उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहेत. कांद्याला सरासरी १,००० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याला मागील १५ ते २० दिवसांआधी ३,५०० ते ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
बाजारभावाच्या किमतीतील घसरणीमुळे कांदा लागवडीचा खर्च हजारो रुपयांच्या घरात असून, तो निघणेही कठीण झाले आहे.
गजानन पायघन, शेतकरी धामणगांव धाड