शेतकरी पीक विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:23+5:302021-02-26T04:48:23+5:30
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना अमलात आणली आहे. ...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना अमलात आणली आहे. परंतु कंपनीच्या त्यात काही जाचक अटी असल्यामुळे शेतकरी त्यापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, लोणार तालुक्यात २०२० मध्ये खरीप हंगामातील पिके सोंगणीला आलेली असताना अतिवृष्टी झाल्यामुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. परंतु प्रशासनाने पावसाची नोंद कमी दाखवल्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा हप्ता भरला होता, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करावी, असे संबंधित प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, परंतु कित्येक शेतकरी असुक्षित असल्याने ते ऑनलाइन तक्रार करू शकले नाही. त्यामुळे अशा जाचक अटीमुळे शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होऊन पीक विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार कशासाठी हवी, असा संतप्त सवाल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अन्यथा विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी लोणार यांना देण्यात आला आहे. लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले. या निवेदनावर अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे, युवा उपाध्यक्ष दत्ता सोनवणे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.