शेतक-यांचा ओढा शेततळ्यांकडे !
By admin | Published: June 26, 2017 10:21 AM2017-06-26T10:21:29+5:302017-06-26T10:21:29+5:30
पाच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट; ८ हजार १४० शेतक-यांची मागणी.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाऊस लहरी झाल्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेततळे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी कृषी विभागाने पाच हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, जवळपास ८ हजार १४० शेतकऱ्यांनी शेततळे मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवदान मिळावे, यासाठी शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
यावर्षी जिल्ह्यात ५ हजार शेततळे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात बुलडाणा उपविभागात १ हजार ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, बुलडाणा तालुक्यात ३००, चिखली ४००, मोताळा ४०० व मलकापूर तालुक्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे.
खामगाव उपविभागासाठी २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असून, खामगाव तालुका ४००, शेगाव ५००, नांदुरा ५००, संग्रामपूर ५०० व जळगाव जामोद ५०० व मेहकर उपविभागासाठी १००० शेततळ्याचे उद्दिष्ट असून, मेहकर तालुका ३००, लोणार २०० व देऊळगावराजा २५० व सिंदखेडराजा तालुक्यासाठी २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे;
मात्र शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढत असल्यामुळे शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतर्गत १३ तालुक्यातून ८ हजार १४० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.