शेतकऱ्यांचे धरणाच्या भिंतीवर मुलाबाळांसह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:13+5:302021-08-13T04:39:13+5:30
ऐन पावसाळा व सणासुदीच्या काळात महिला व लहान मुलाबाळांसह धरणाच्या भिंतीवर उपोषणाला बसलेल्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ...
ऐन पावसाळा व सणासुदीच्या काळात महिला व लहान मुलाबाळांसह धरणाच्या भिंतीवर उपोषणाला बसलेल्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळून न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
सारंगवाडी संग्राहक तलावाचे काम २०१२-१३ पासून सुरू असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी खोदल्या आहेत. काही शेतकऱ्यांना अंशतः मोबदला मिळाला, तर काहींना छदामही मिळाला नाही. गेल्या आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती नाही. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. संबंधित विभागाकडे चकरा मारून चालढकलीचे उत्तर मिळत आहे. दुसरीकडे मात्र काम सुरू असून कंत्राटदाराला द्यायला पैसे आहेत, शेतकऱ्यांनी जमीन देऊनही त्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळालाच पाहिजे अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा भेटप्रसंगी बोलताना राम डहाके यांनी प्रशासनाला दिला.
उपोषणास बसलेले शेतकरी
उपोषणस्थळी समाधान शेळके, गोपाल शेळके, सतीश शेळके, कृष्णा शेळके, गीताबाई शेळके, गजानन काकडे, मदन शेळके, अरुण शेळके, गजानन शेळके, विजय शेळके, लक्ष्मीबाई शेळके, विलास आरसोडे, दीपक आरसोडे, विठाबाई रसाळ, देवानंद काळे, सीताराम आडे हे उपोषणकर्ते शेतकरी महिला भगिनींसह अनिल राठोड, आशिष राऊत, सलीम खान व शेतकरी सहभागी झाले आहेत.