शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मिळाले ९ लाख ७५ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:24 AM2020-12-20T11:24:58+5:302020-12-20T11:26:20+5:30
Khamgaon News खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात कमालीची घट येते; मात्र वन्य प्राण्यांनी नुकसान केले तर त्याची भरपाई वन विभागाकडून देण्यात येते. खामगाव तालुक्यातील शेतक-यांना यावर्षी ९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली असून, ३ लाख ७३ हजार ६०५ रुपये मंजूर झाले आहे.
गत काही वर्षांपासून जंगलांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे प्राण्यांचे अधिवास संपले. त्यामुळे रोही, हरीण, चितळ, जंगली डुकरांनी शेताकडे आपला मोर्चा वळविला असून, मोठ्या प्रमाणात पिके फस्त करतात. या अभयारण्यातील प्राणी जंगलालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात घट येते.. वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येते. त्याकरिता शेतक-यांना नुकसानाची माहिती ४८ तासाच्या आत वन विभागाला देणे आवश्यक आहे.
व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मिळतात १५ लाख
वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास १५ लाख रुपये भरपाई मिळते.
तसेच व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये व किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो. खासगी रुग्णालयात उपचार करणे अगत्याचे असल्यास २० हजार रुपये प्रती व्यक्ती देण्यात येते.
पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास
गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार यापैकी कमी असणारी रक्कम मिळते. तसेच मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.
गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.
शेतात वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केले तर शेतक-यांना भरपाई मिळते. त्याकरिता शेतक-यांनी ४८ तासांच्या आत वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात व त्यांना भरपाईसुद्धा देण्यात येत आहे.
- के. डी. पडोळ
वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव