रब्बीत गहू आणि हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:16 PM2020-11-18T16:16:25+5:302020-11-18T16:16:54+5:30
Khamgaon Agriculture News शेतकऱ्यांनी रब्बीसाठी ज्वारी, हरभरा, गहू, मका, कादे, भुईमुग आदी पिकांचे नियोजन केले आहे.
- सचिन बोहरपी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला. त्यामुळे आता रब्बीची पिके चांगली येणार असल्याचा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी रब्बीसाठी ज्वारी, हरभरा, गहू, मका, कादे, भुईमुग आदी पिकांचे नियोजन केले आहे. त्याबरोबरच चारा पिकेही घेतली जाणार आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकांबरोबर इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, आता मात्र रब्बीचे पीक चांगले येण्याची शेतकरी आशा बाळगताना दिसतो.
उपलब्ध पाणीसाठ्यामुळे शेतकरी आता फळबाग, तुती, चारापिके तसेच इतर बागायती पिके घेण्याकडेही वळताना दिसतोय. संरक्षित सिंचानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने पीक उत्पादकतेत वाढ होण्यास मदत मिळेल.खामगाव तालुक्यातील शेतक-यांचा कल गहू आणि हरभरा पिकाकडे वाढताना दिसतो आहे.खरीपाच्या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे.
रब्बी हंगामात यंदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पारंपरिक पिकांबरोबर नवीन पिकांची निवड करावी. त्याबरोबरच आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल.
-व्ही,बी राऊत,
प्रभारी कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव.