शेतकऱ्यांची बाजारात गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 12:05 AM2017-07-06T00:05:19+5:302017-07-06T00:05:19+5:30
पाऊस पडताच सुरु झाली पेरणीची लगबग!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गत दोन-तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे परिसरात पेरणीची लगबग सुरु झाली असून, बाजारात खत व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला होता. पावसाळा लवकर सुरु होईल, असे वाटल्याने शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे घाई-घाईत उरकून घेतली; परंतु त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारली. त्यामुळे एक-दोन पावसावर पेरणी करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अनेकांच्या पेरण्या उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती, तर उर्वरित शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकरी पेरणीसाठी खत व बियाणे खरेदी करीत आहेत, तर अगोदरच पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असून, हे शेतकरी पिकांची फवारणी व अन्य पीक मशागतीची कामे उत्साहाने करीत आहेत, तर ज्यांची पेरणी करणे अद्याप बाकी आहे, त्यांनी पेरणीची तयारी चालविली आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. काही शेतकरी अनेक दुकानात भाव विचारुन मगच खरेदी करतात.
कृषी केंद्रधारकांचीच चालते मर्जी
अनेक शेतकरी हे त्यांच्या विश्वातील कृषी केंद्रांवरच जावून खत व बियाणे खरेदी करीत आहेत. दुकानदारांनी सांगितल्याप्रमाणे नवीन वाणाचे बियाणे व खते ते खरेदी करताना दिसतात. अनेक दुकानदार शेतकऱ्यांना आपल्या मर्जीनुसार पटवून देत काही महागडे बियाणे खरेदी करण्यास बाध्य करीत असल्याचेही दिसून येते.
सोयाबीनकडे वाढला शेतकऱ्यांचा कल
यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. मागिल वर्षी तूर या पिकाने शेतकऱ्यांना उत्पादन दिले; पण उत्पन्न नाही. त्यामुळे तुरीबाबत शेतकऱ्यांमध्ये काहीशी उदासीनता निर्माण झालेली आहे, तर पऱ्हाटी लागवडीचा खर्च व मेहनत जास्त असल्याने अनेक जण सोयाबीनला पसंती देताना दिसून येतात.