शेतक-यांना आता वन्य प्राण्यांचा त्रास
By admin | Published: July 9, 2017 09:41 AM2017-07-09T09:41:13+5:302017-07-09T09:41:13+5:30
खामगाव परिसरात कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : परिसरात अनेक शेतकर्यांच्या पेरण्या चांगल्या साधलेल्या असून, पिके सुस्थितीत आहेत. मात्र, या कोवळ्या पिकांवर हरीण, माकडे व इतर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे. नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळी पाने हे प्राणी फस्त करीत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी लगेच शेत मशागतीची कामे उरकून घेत पेरणीही आटोपून घेतली. यानंतर मात्र पावसाने काही भागात हुलकावणी दिली, तर काही भागात पुनरागमन केले. त्यामुळे काही भागातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ज्या भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली त्या भागातील पेरण्या चांगल्या साधल्या आहेत. परिणामी या भागात कोवळी पिके वार्यावर डुलताना दिसत आहेत. परंतु या पिकांवर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडत आहे.
नुकतेच उगवलेले बीजांकुर व कोवळ्या पिकांची हिरवीगार पाने हरीण, माकडे फस्त करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांना दिवसभर शेतात थांबून रखवाली करावी लागते. त्यामुळे शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे. दिवसभर पिकाची राखण करुनही रात्रीच्यावेळी वन्य प्राणी येऊन पिकांचे नुकसान करतातच. विशेषत: रानडुकरे रात्री शेतांमध्ये घुसून मोठय़ा प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.