शेत जमीनीचे मुल्यांकन रखडल्याने त्रस्त शेतकऱ्याने केलं विष प्राशन, समृद्धी महामार्गात गेली जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 07:39 PM2018-05-12T19:39:13+5:302018-05-12T19:39:13+5:30
समृद्धी महामार्गात गेलेल्या शेत जमीनीच्या मुल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेल्या किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी ११ मे रोजी दुपारी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
दुसरबीड (जि. बुलडाणा) : समृद्धी महामार्गात गेलेल्या शेत जमीनीच्या मुल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेल्या किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी ११ मे रोजी दुपारी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांचीप्रकृती स्थिर आहे. कृषी अधिकार्यांनी मुल्यांकनासाठी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही विष प्राशन केलेल्या शेतकर्याचे बंधू पंजाबराव मांटे यांनी केला आहे.
किनगाव राजा येथील नंदकिशोर शंकरराव मांटे यांची तसेच त्यांच्या कुटुंबातील भारत शंकरराव मांटे, वर्षा पंजाबराव मांटे यांची मिळून पाच एकर शेतजमीन गट नं. २१३ व २१४ मध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृदधी महामार्ग नंदकिशोर मांटे यांच्या शेतातून जातो. त्यामुळे त्यांची जमीन यासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे.
कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून जमीन अधिग्रहण व त्यातील बाबींसाठी नंदकिशोर मांटे यांनी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. सोबतच शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतातील सर्व बाबींचे योग्य मुल्यांकन केले जावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र शेतातील आंब्यांच्या बागेचे मुल्यांकनच केले गेले नसल्याचा मांटे कुटुंबियांचा आरोप आहे. या वडीलोपार्जीत शेतात पूर्वी मोसंबीची बाग होती. मात्र मध्यंतरीच्या दुष्काळामुळे ती बाग मोडून आंब्यांची झाडे लावण्यात आली.
मात्र मुल्यांकनात ही झाडे डावलण्यात आली. प्रकरणी नंदकिशोर मांटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. मात्र जमीनीचे व्यवस्थीत मुल्यांकन न झाल्यामुळे त्यांनी ११ मे रोजी दुपारी विषारी औषध प्राशन करून या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकार्यांच्या पत्रानंतरही मुल्यांकन, अधिग्रहण व मोबदल्याची प्रक्रिया पार पडली नाही. त्यातच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लाचेची मागणी केल्यामुळे त्रस्त होऊन नंदकिशोर मांटे यांनी दुपारी शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांनी विष प्राशन केल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा तेथून सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जालना येथील रुग्णालयात त्यांना हलविणयात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांचे भाऊ पंजाबराव मांटे यांनी सांगितले. या प्रकरणी तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
आमदार खेडेकरांनीही दिले होते पत्र
मांटे कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून स्थानिक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही याबाबत यंत्रणेला पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तीन एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांना पत्र पाठवून संबंधीत प्रकरणात कृषी विभागाने सर्व बाबी तपासून नियमानुसार तत्काळ मुल्यांकन करावे व महसूल उपविभागाचे मुल्यांकनाचे प्रस्ताव तत्काळ जिल्हास्तरीय मुल्यांकन समितीकडे पाठवावेत असे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही मुल्यांकन, अधिग्रहण आणि मोबदल्याची प्रक्रिया पारपडली नाही.
नंदकिशोर मांटे हे विष प्राशन करून किनगाव राजा पोलिस ठाण्यात आले होते. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमीनीचे योग्य मुल्यांकन होत नाही. त्यासाठी अधिकारी त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती समजताच पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयातॉ उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत अद्याप तक्रार दाखल नाही.
(जे. बी. शेवाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, किनगाव राजा)
संबंधीत शेतकर्याकडून चुकीच्या पद्धतीने मुल्यांकन करण्याची गळ घातल्या जात होती. यासंदर्भात आठ मे रोजी ते भेटले होते. तेव्हा जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयालाही संबंधीत प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. अनुषंगीक कागदपत्रेही उपलब्ध आहे.
(प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा)