शेतक-यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: June 20, 2017 04:32 AM2017-06-20T04:32:00+5:302017-06-20T04:32:00+5:30
१९ जून रोजी एसडीओ कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी १९ जून रोजी एसडीओ कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शासनाने शेतकर्यांना कायमस्वरुपी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल २00 रुपये अनुदान जाहीर केले होते ते अनुदान त्वरित वाटप करावे, भूमिहिन, शेतमजूर, विधवा, वयोवृद्ध यांना संजय गांधी कार्यालयामार्फत दरमहा १ हजार रुपये मानधन मंजूर करावे, त्याच बरोबर शासनाने शेतकर्यांना खरीप हंगामासाठी १0 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले असले, तरी सदर अनुदानाचे वाटप अद्याप सुरू झालेले नसल्याने ते अनुदान वाटप त्वरित सुरू करावे, यांसह सर्वसामान्यांच्या इतरही मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी गवई यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या धरणे आंदोलनाचे आयोजन महिला नेत्या पंचफुलाबाई अंभोरे यांनी केले होते. धरणे आंदोलनाला कन्हय्या मोरे, मनिष जाधव, भिवसन वानखेडे, बाबूराव मोरे, कौसल्या कंकाळ, जानकाबाई सपकाळ, शशिकला अंभोरे, रामकोर कटारे, रामभाऊ क्षीरसागर, रेखा शिर्के, रत्नमाला थोरात, यादव गवई यांच्यासह शेकडो शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.