बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:18 AM2021-06-02T11:18:03+5:302021-06-02T11:18:10+5:30

Agriculture News : यंदा खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली; पण बियाणांची तडजोड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 

Farmers shocked by seed price hike | बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : सोयाबीन बियाणांची इतर बियाणांच्या तुलनेत झालेली दीडपट वाढ शेतकऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. यंदा खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली; पण बियाणांची तडजोड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून, त्यांना दरवाढीचा शॉक बसला आहे. 
मागील वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पन्नातून नफा तर सोडा साधा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीनचे उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांकडे बियाणांसाठी सोयाबीन शिल्लक राहिली नाही. दरवर्षी बरेच शेतकरी पुढील हंगामाच्या पेरणीसाठी उत्पादित सोयाबीनमधून बियाणांसाठी सोयाबीनची साठवणूक करून ठेवत होते. 
मात्र, यावर्षी तसे झाले नाही. मागील वर्षीच्या उत्पादनात कमालीची घट आल्याने बँकांचे, सावकारांचे व उसनवारीच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता आली नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणावे कुठून, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. आधीच लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता बियाणांची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी आहे. 

बियाणांच्या दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालकांवरही झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे बियाणे खरेदी करतेवेळी दुकानदारांनाही विचार करावा लागेल. 
-संतोष देशमुख, कृषी केंद्रचालक

मागील हंगामातील सोयाबीनची सोंगणीच करावी लागली नव्हती. यामुळे उत्पादन शून्य झाले. तसेच कपाशीवर बोंडअळी आल्याने उत्पादनात घट आली. यामुळे लागवड खर्चही फसला आणि आता सोयाबीनच्या बियाणांमध्ये झालेली दीडपट वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. 
-भास्कर तायडे, शेतकरी

Web Title: Farmers shocked by seed price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.