शेतकऱ्यांनी उर्जादाता व्हावे, डांबरनिर्मिती करावी : नितीन गडकरी
By सदानंद सिरसाट | Published: August 18, 2023 03:04 PM2023-08-18T15:04:44+5:302023-08-18T15:06:05+5:30
पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे.
खामगाव (बुलढाणा) : पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे. त्यामध्ये बदल होण्यासाठी शेतकऱ्यांनी आता उर्जादाता व्हावे, डांबरनिर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मलकापूर येथे केले. नांदुरा ते चिखली रणथम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे लोकार्पण ना. गडकरी यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार राजेश एकडे, अँड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अतिथी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. गडकरी यांनी रस्त्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ टक्के काम येत्या महिन्याभरात ते पूर्ण होईल. या रस्त्याने गुजरातमध्ये वेगाने पोहचता येईल. विदर्भाच्या विकासासाठी रस्त्याचा विकास महत्त्वपूर्ण आहे.
त्यासाठीच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. त्याचा फायदा आता कृषी उत्पादनाला वेळेत पोहचवण्यासाठी होईल. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांसोबतच वीजनिर्मिती करावी, इथेनाँल, डांबर निर्मितीसाठी विविध उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने येत्या काळात राबवल्या जातील. त्यासाठी असलेल्या शासकीय योजनाही सुरू केल्या जातील, त्याचा शेतकऱ््यांना लाभ होईल. त्यामुळे विदर्भातील बेकारी, भूकबळी, आत्महत्यांना आळा बसेल, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील रस्ता विकासाच्या झालेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली.