शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे - भाऊसाहेब फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:14 AM2018-01-16T00:14:57+5:302018-01-16T00:19:45+5:30
रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे पौष्टिक अन्नधान्य मिळेल व आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : विदर्भात वनसंपदा, जलसंपदा, सुपीक जमीन व नैसर्गिक संपदा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असूनदेखील बळीराजा मोठय़ा प्रमाणात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. हे टाळण्यासाठी यापूर्वीच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज होती; परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे पौष्टिक अन्नधान्य मिळेल व आरोग्य चांगले राहण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.
भारतीय गोवंश रक्षण, संवर्धन परिषदद्वारा शेतकरी जागर यात्रेचा शुभारंभ सिंदखेडराजा येथून १५ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अभिवादन करून १५ जानेवारी रोजी प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. सदर जागर यात्रा सिंदखेडराजावरून निघणार असून, वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम पावन भूमिमध्ये समारोप होणार आहे. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम शेती औजारांचे विधिवत पूजन करून गोमातेचेसुद्धा पूजन केले. यावेळी नारायण महाराज शिंदे, उद्धव हिवराळे, समाधान शिंगणे, सनदाजी गुप्ता, डॉ.हेमंत जांभेकर, दिवाकर नेरकर, अँड.अमोल अंधारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कृषी अधिकारी बीपीन राठोडसह कर्मचारी उपस्थित होते.