शेतकऱ्यांचे पाण्यात बसून उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:35+5:302021-02-06T05:05:35+5:30
पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या ...
पेनटाकळी प्रकल्पाला असलेला कालवा हा दुधा, रायपूर, सावत्रा, जानेफळ, गोमेधर, वरवंड हा मार्गक्रमण करीत जातो. या आधारे सोडलेल्या पाण्यावर शेतकरी सिंचन करत आहे; मात्र प्रशासनाच्या लेट लतीफ कारवाईमुळे या प्रकल्पाचे कालव्याचे काम अजूनही अर्धवट आहे. हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात आला नाही. त्यामुळे या कालव्याच्या देखभाल दुरुस्ती करिता आर्थिक तरतूद नसल्यामुळे या कालव्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. या कालव्याला ठिकठिकाणी पाझर फुटले आहेत. यामुळे कालव्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खराब होत असून नापीक बनत आहेत. या कालव्यामध्ये बाभळी, निंबाची झाडे, गवत वर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावरच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटर पर्यंत पाणी कालव्याद्वारे न नेता पाईपलाईनद्वारे नेण्यात यावे, या मागणीकरिता शुक्रवारी सकाळी पेनटाकळी प्रकल्पातील पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी एकनाथ सास्ते, गजानन अवचार, प्रभाकर अवचार, काशिनाथ वाहेकर, संजय वाहेकर, दत्तात्रय वाहेकर, दीपक पागोरे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, गजानन रहाटे, सतीश मस्के, गणेश रहाटे, गजानन रहाटे, दत्तात्रय काळे, सागर रहाटे आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करावा
या कालव्याचे काम पूर्ण करून हा कालवा पेनटाकळी प्रकल्पाकडे हस्तांतरण करण्यात यावा. जेणेकरून त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे प्रशासन वेळेवर करेल अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कालव्याला पेनटाकळी शिवारात भगदाड पडल्याने फुटला होता. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच याशिवाय शेती खरडून गेली आहे. या कालव्याद्वारे असेच पाणी सोडले तर आणखी काही ठिकाणी हा कालवा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होईल.