शेतकऱ्यांनी रस्त्यावरच सुरू केले उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:04+5:302021-03-17T04:35:04+5:30
अमडापूर : अमडापूर ते मेडशिंगा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ...
अमडापूर : अमडापूर ते मेडशिंगा रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याने शेतकऱ्यांनी काम बंद पाडले हाेते, तसेच या रस्त्याच्या तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी या रस्त्यावरच १६ मार्चपासून उपाेषण सुरू केले आहे.
मेडशिंगा येथील ग्रामस्थ व अमडापूर येथील शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निकृष्ट बांधकामाचा आराेप करून रस्त्याचे काम बंद पाडले हाेते. या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली हाेती. त्यानंतर बुलडाणा येथील अभियंता पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली. शेतकरी व गावकऱ्यांना कामची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. ठेकेदाराचे देयक काढू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती. मात्र, त्याचीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे अमडापूर ते मेडशिंगा रस्त्यावर असलेल्या साकरशाबाबा मंदिराजवळ मंडप उभारून व कोरोनाचे सर्व नियम पाळत शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन व्हावे, म्हणून केवळ चारच शेतकऱ्यांनी उपाेषण सुरू केले आहे. यामध्ये अमडापूर ग्रामपंचायत सदस्य पुत्र प्रकाश खराडे, सागर कदम, मेडशिंगाचे माजी सरपंच भगवान शेजोळ, गोविंद सोनुने आदींचा समावेश आहे.