खरेदी केंद्रावरील लुटीविरोधात शेतकरी रस्त्यावर!
By admin | Published: May 10, 2017 07:14 AM2017-05-10T07:14:42+5:302017-05-10T07:14:42+5:30
संतप्त शेतक-यांनी ९ मे रोजी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन
चिखली : नाफेड खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या हमालांच्या मनमानी विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी ९ मे रोजी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे खामगाव-जालना महामार्गावरील वाहतूक सुमारे ३ ते ४ तास ठप्प झाली होती. शेतकऱ्यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली.
येथील नाफेड खरेदी केंद्रावर हमालाद्वारे शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या; मात्र त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू होती. दरम्यान, दरेगाव येथील गणेश विठोबा मान्टे या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल विक्रीसाठी आणला असता, खरेदी केंद्रावरील चाळणी क्रमांक १ व ३ वरील हमालांनी तब्बल १०० रुपये पोत्याप्रमाणे हमाली मागितली. ती देण्यास मान्टे यांनी नकार दिला. शासन निर्णयानुसार २० रुपये पोते हमाली देण्यास मान्टे तयार होते; मात्र १०० रुपये प्रती पोत्याप्रमाणे नकार दिल्यामुळे हमालांनी त्यांना डावलून दुसऱ्या शेतकऱ्याचा माल मोजायला सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. दरम्यान, येथे उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने खरेदी केंद्रावर तणाव वाढला होता. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार मनीष गायकवाड, ठाणेदार महेंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती सत्येंद्र भुसारी, जी.प. सदस्य शरद हाडे, स्वभिमानीचे विनायक सरनाईक, जनशक्ती संघटनेचे प्रशांत ढोरे यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, तहसीलदार गायकवाड व बाजार समितीचे सभापती डॉ.भुसारी यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतर जादा रक्कम आकारणाऱ्या १२ हमालांचे ११ मे पर्यंत हमाल परवाने निलंबित करण्यात आले. परवाने निलंबित केलेल्या हमालांमध्ये अशोक नाटेकर, रामेश्वर शेळके, संभाजी नाटेकर, बबलू पवार, सुनील पवार, शे.फेरोज शे.हसम, नीलेश आराख, अनिल पवार, ज्ञानेश्वर सोनुने, राजेश गोपले, मारोती साळवे, विजय बोरकर यांचा समावेश आहे.