शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:30 AM2017-11-14T00:30:23+5:302017-11-14T00:31:38+5:30
लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातील शेतकर्यांच्या शेतीमालाला अद्यापही हमीभाव मिळत नसल्याने व पिकाच्या करारावर घेतलेले कर्ज फिटत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तर रब्बीच्या पेरणीची जुळवाजुळव करताना शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील शेतकर्यांवर गेल्या चार-पाच वर्षापासून आस्मानी, सुलतानी, नैसर्गिक आपत्तीने पीक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांची आर्थिकस्थिती खालावली आहे. त्यातच शासनाच्या वेळकाढून पणामुळे निघालेल्या कुठल्याच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाले आहेत. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शासनाने कर्जमाफीची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असणार्या शेतकर्याची दिवाळी मात्र अंधारातच गेली. दिवाळीनंतर महिना होत आला तरी अद्यापही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यंदा खरीप, रब्बी हंगामी पिकांचे बि-बियाणे, खत, औषधी, पेरणी पिक काढणी व शेती मशागतीची मजुरी या सर्वांचे भाव वाढले आहे.
तर दुसरीकडे शेती मालाला भाव नाही, नेहमी शेतमालाची बाजारात आवक वाढली की, शेतमालाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडते. मात्र याकडे शासनासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी कायम आर्थिक विवंचनेत असतो. परिणामत: त्याचा आर्थिकस्तर उंचावत नसल्याचे सुज्ञ नागरिक बोलून दाखवित आहेत.
सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता
सोयाबीनच्या नगदी पिकाच्या भरवशावर बरेच शेतकरी खाजगी सावकाराकडून कर्ज स्वरुपात पैसे घेऊन पिकांचा लागवड व मशागत खर्च भागवत असतात. मात्र यावर्षीच्या सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे बि-बियाणे व लागवड खर्चही भागत नसल्याने सावकाराचे देणे कसे द्यायचे ह्या विवंचनेत शेतकरी पडला आहे.