वीज तुटवड्याचा फटका शेतकर्यांना
By admin | Published: May 13, 2017 06:45 PM2017-05-13T18:45:45+5:302017-05-13T18:45:45+5:30
दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्यासुमारास सुरू करण्यात येत आहे.
बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे वीजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरणने कृषि पंपांना देण्यात येणाऱ्या वीजेत कपात केली असून, दिवसा विद्युत पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे.
दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळींब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पिकही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. वऱ्हाडात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पिक घेतल्या जाते.उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषि पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषिपंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर विद्युत पुरवठा बंद असतो तर रात्रीच्या
वेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणला महानिर्मितीसह विविध स्त्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मे.वॅ.पर्यन्त विजेची उपलब्धता कमी असतांनाही महावितरणने १५०० मे.वॅ. पर्यन्त आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.
राज्यातील काही संच तांत्रिककारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासोबतच इतर स्त्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.