खामगाव तालुक्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या
By अनिल गवई | Published: November 14, 2023 04:16 PM2023-11-14T16:16:11+5:302023-11-14T16:16:45+5:30
बाळू पंढरी वानखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
खामगाव: बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे एका ५१ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे उघडकीस आली. बाळू पंढरी वानखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत देवानंद धोंडू जाधव यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, बाळू पंढरी वानखेडे आणि त्यांची पत्नी हिंगणा कारेगाव येथील शेत शिवारातील शेतीची वहिती करीत होते. या शेतीच्या मशागतीसाठी मृतक शेतकरी बाळू वानखेडे यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्जाचा भरणा करण्यास ते असमर्थ ठरले. त्यामुळे आर्थिक विंवचनेतून कर्जबाजारी शेतकर्याने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास शिवाजी दळवी करीत आहेत.