फुलकोबी’ उत्पादनातून सावरतोय शेती व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:36 PM2018-09-09T16:36:52+5:302018-09-09T16:38:43+5:30
खामगाव : खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव : कोरडवाहू तर कोरडवाहूच... पण ज्यांच्याकडे सिंचनाची थोडीबहूत सोय आहे, अशा शेतकºयांनाही शेती परवडेनासी झाली आहे. आपल्याकडे बागायतदार शेतकरी ज्या पिकाकडे उत्पन्नाची हमी देणारे पिक म्हणून पाहतात, ती कपाशी सुध्दा गेल्या काही वर्षांपासून दगा देत आहे. त्यामुळेच खामगाव तालुक्यात काही शेतकरी ‘फुलकोबी’ उत्पादनातून शेतीव्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोरडवाहू शेती गेल्या अनेक वर्षांपासून पिकेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस साथ सोडत चाललेला निसर्ग अन् त्यातून अपुरा तसेच लहरी स्वरूपाचा पडणारा पाऊस यामुळे कोरडवाहू शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांनी थोडी का होईना सिंचनाची व्यवस्था करून घेतली आहे. सिंचनाची व्यवस्था झाली, तरी यामाध्यमातून पारंपारिक कपाशीचे पिक घेण्याकडेच शेतकºयांचा कल राहीला आहे. परंतु अलीकडे रोगराईने पिकाची होत चाललेली वाताहत पाहता, कपाशी सुध्दा शेतकºयांची निराश करत आहे. त्यातच गेल्या वर्षी बोंडअळी आली अन् कपाशीाबाबत शेतकरी अधिकच सावध झाले. यातूनच एक वेगळी वाट धुंडाळत शेतकरी आता फुलकोबी पिकविण्याकडे वळत आहेत. खामगाव तालुक्यात साधारणपणे अनेक गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. परंतु भाजीपाल्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अलीकडे वांगे, टमाटे या पिकांसोबतच फुलकोबीची गोडी लागली आहे. हे पिक शेतकºयांना बºयापैकी उत्पन्न मिळवून देणारे ठरत असून यामुळे तोट्याचा होत चाललेला शेती व्यवसाय सावरण्यास बळ मिळत आहे.
एकरी लाखाचे उत्पन्न मिळवून देणारे पिक
आपल्याकडे दोन ‘सिझन’ मध्ये फुलकोबीचे पिक घेतल्या जाते. पावसाळ्यात
सुमारे ६० ते ६५ क्विंटल कोबीचे उत्पन्न एक एकर शेतीत होते. हिवाळ्यात हेच उत्पन्न १२५ ते १५० क्विंटलवर पोहचते. दोन्ही सिझन मिळून १ लाख ५० हजार रूपयांचे उत्पन्न होते. यातून खर्च वजा जाता १ लाख रूपये निव्वळ नफा मिळतो, असे शेतकºयांचे म्हणने आहे.
‘कोबी’लाही सतावतो ‘खोडकीडा’
इतर पिकांप्रमाणेच फुलकोबी पिकावरही रोगराई येतेच. त्यात पावसाळ्यात खोडकिडा जास्तच त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बुरशी नाशक औषधाचा वापर शेतकरी करतात. परंतु उत्पन्नासाठी कोबी चांगला पर्याय असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.
फुलकोबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. तशी याआधीही कोबीची लागवड होतीच, मात्र सध्या इतर पिके दगा देत असल्याने कोबीचे क्षेत्र वाढविले आहे.
गजानन चोपडे,
शेतकरी घाटपुरी