रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:39 PM2020-12-12T12:39:19+5:302020-12-12T12:41:49+5:30
Crop insurance News नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खरीप हंगामात माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे. पीक विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर असून, शेतकऱ्यांकडे आता केवळ चारच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.
शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. त्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा याेजना राबविण्यात येते. खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. ऑक्टाेबर, नाेव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, रब्बीचा पीक विमा काढण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे चित्र आहे. नऊ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला आहे.
निकषाचा फटका
खरीप हंगामातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विमा काढूनही मदत मिळालेली नाही. विमा कंपनीचे निकष शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहेत. त्यामळे, रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विम्याची भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.
- सुधाकर राऊत, अंजनी बु.
नुकसान भरपाईची प्रतीक्षाच
खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिकांचा विमा काढला हाेता. खरिपातील मूग, उडीद आणि साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या मूग, उडिदाच्या शेंगांना काेंब फुटले हाेते. खरिपाची जवळपास सर्वच पिके हातून गेल्यावरही अनेक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच आहे. मदत मिळेल किंवा नाही, याविषयी शेतकऱ्यांना माहिती नसल्याचे चित्र आहे.