बँकांच्या सलग सुटीमुळे शेतकरी अडचणीत!
By admin | Published: June 27, 2017 09:26 AM2017-06-27T09:26:01+5:302017-06-27T09:26:01+5:30
कर्जमाफीच्या घोषणेमुळे मंगळवारी उसळणार गर्दी!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बँकांना सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यापासून बँका बंदच आहेत. त्यामुळे कर्र्जमाफी मिळालेले शेतकरी बँका उघडण्याची वाट पाहत असून, मंगळवारी बँकांमध्ये एकच गर्दी उसळणार आहे.
बहुप्रतीक्षित ठरलेली सरसकट कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी जाहीर केली. यामध्ये शेतीची कोणतीही मर्यादा न ठेवता दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. यात जून २०१६ पर्यंतच्या थकीत कर्जाचा समावेश आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पेरणीचे दिवस आलेले असताना व अनेक शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नसल्याने त्यांची आधीच अडचण झालेली आहे. त्यात शनिवारी जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे अशा शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला; मात्र ज्या दिवशी कर्जमाफी जाहीर झाली तो चवथा शनिवार असल्याने बँका या दिवशी बंदच होत्या. दुसऱ्या दिवशी रविवारची साप्ताहिक सुटी व सोमवारी रमजान ईदची सुटी असल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंदच राहिल्या.
एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्याने त्यांना नवीन कर्जाबाबत बँकेकडे विचारणा करण्यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे; मात्र बँकांची सलग सुटी आली. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली. आता मंगळवारी बँका उघडताच सर्व बँकांमध्ये गर्दी उसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा ताण चांगलाच वाढणार असून वादविवादाचे प्रसंगही उद्भवू शकतात.
बँकांकडून पुन्हा टोलवाटोलवीची शक्यता!
बँकांचे शेतकऱ्यांसोबत सहकार्याचे धोरण नसल्याचे नेहमीच दिसून येते. या अगोदर कर्जमाफीची घोषणा सरकारने करुन शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज पेरणीसाठी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते; परंतु शासनाने परिपत्रक काढूनही बँका याबाबत आम्हाला आदेशच प्राप्त झाले नसल्याचे अजूनही सांगत आहेत. सदर १० हजाराचे तत्काळ कर्ज वाटप अद्यापही शेतकऱ्यांना सुरु झालेले नाही. सदर कर्ज वाटप रखडलेले असताना आता नवीन आदेशही आम्हाला प्राप्त नसल्याचे सांगून बँका टोलवाटोलवी करु शकतात.