सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 08:51 AM2017-11-29T08:51:41+5:302017-11-29T08:54:22+5:30
मन प्रकल्पातंर्गत सिंचन क्षेत्रामध्ये येत असलेल्या शिर्ला नेमाने आणि कंचनपूर गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
बुलडाणा : मन प्रकल्पातंर्गत सिंचन क्षेत्रामध्ये येत असलेल्या शिर्ला नेमाने आणि कंचनपूर गावातील शेतकर्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
यासंदर्भात दोन्ही गावातील शेतकर्यांनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. मन प्रकल्पातंर्गत या दोन्ही गावातील सिंचन क्षेत्र येते. मात्र यावर्षी
मागणी करूनही गावाला पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. दरवर्षी पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. मात्र यावर्षी ते देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते देण्यात यावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे. त्यातच शेगाव संस्थांनालाही या प्रकल्पावरून पाणी दिल्या जाते. त्यांनीही यावेळी जादा पाण्याची मागणी केली आहे. परिणामी या दोन्ही गावातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी न मिळाल्यामुळे शेतकर्यांची उभी तूर जळून जात आहे तर गव्हाचेही पिक शेतकर्यांना घेता आलेले नाही. त्यामुळे प्रकरणी उपाययोजना करून मन प्रकल्पातील १.५ दलघमी पाणी आणि अन्य ठिकाणीसाठी आरक्षीत केलेले जादाचे पाणी शेती सिंचनासाठी द्यावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे. पाणी उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. शेतकर्यांनी जर आत्महत्या केली तर शासन त्यास जबाबदार राहील, असे या शेतकर्यांनी निवेदनात म्हंटले आहे. बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे यांना यांना यासंदर्भात मंगळवारी हे निवेदन देण्यात आले आहे. दत्तात्रय नेमाने, गणेश कचरे, रामदास शेगोकार, बाळू आवरे, अॅड. सतिषचंद्र रोठे, उमेश शिंदे, रामेश्वर शिंदे, भीमराव आवारे यांच्यासह अन्य शेतकर्यांनी ही मागणी करणारने निवेदन दिले आहे.