संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभावासाठी शेतकरी घालणार संसदेला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:30 PM2018-11-23T17:30:18+5:302018-11-23T17:32:28+5:30
बुलडाणा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्याघऊन देशभराती शेतकरी हे २९ आणि ३० नोव्हेंबरला ...
बुलडाणा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्याघऊन देशभराती शेतकरी हे २९ आणि ३० नोव्हेंबरला दिल्लीत संसदेला घेराव घालणार आहेत. देशातील २०४ शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत. दरम्यान, देशातील काही महत्त्वपूर्ण नेतेही या आंदोलनात सहभागी होणार आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी संसदेमध्ये मांडलेल्या ‘शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक २०१८’ आणि ‘शेतीमालाला दीडपट हमीभाव’ या दोन विधेयकांवर तसेच शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समितीच्यावतीने हे घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील या २०४ संघटना आता एकत्र आल्या असून शेतकर्यांच्या प्रश्नासाठी देशपातळीवर त्यातून अखिल भारतीय किसन संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला. खा. राजू शेट्टी आणि समितीच्या नेत्यांनी संपूर्ण देशभर पाहणी करून विविध राज्यातील शेतकर्यांच्या समस्या, त्यांचा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्यांचे सत्र या मागील कारणे व त्यावरील उपाययोजना याचा अभ्यास करून उपरोक्त दोन विधेयके लोकसभेत मांडली आहेत. या दोन्ही विधेयकांवर आणि शेतकर्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी समितीने केली आहे. दरम्यान, त्यादृष्टीने अपेक्षीत हालचाल न झाल्याने समितीने हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनामध्ये देशातील जवळपास २५ हून अधिक पक्ष सहभागी होणार असून विविध राज्यातील मुख्यमंत्री, माजी पंतप्रधानांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, चंद्राबाबु नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी, ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला, मायावती, अखिलेश यादव, शरद यादव यांनाही या आंदोलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून या आंदोलनात शेतकर्यांना सहभागी होता यावे म्हणून दिल्ली येथे जाण्यासाठी कोल्हापूर येतून स्वतंत्र रेल्वे आरक्षीत करण्यात आली असून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात ही स्वाभीमानी एक्सप्रेस २८ नोव्हेंबरला दिल्लीसाठी रवाना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातीलही शेतकरी या आंदोलनासाठी रवाना होणार असून शेतकर्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले आहे.