कर्ज वाटपाच्या कासवगतीने शेतकरी चिंतेत; उसनवारी फेडण्यास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:30 PM2018-07-22T14:30:11+5:302018-07-22T14:31:22+5:30
जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ते १० दिवसानंतरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली होती. सधन शेतकरी पेरणी करताना पाहून इतर शेतकऱ्यांनीही पीक कर्जाच्या भरवशावर व्यापाऱ्यांकडून उधारीने बी-बियाणे, रासायनिक खते तसेच ट्रॅक्टर मालकांची सुद्धा मनधरणी करीत उधारीने ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून घेतली. पिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. कृषी केंद्र चालक तसेच ट्रॅक्टर मालक पैशासाठी शेतकऱ्यांच्या दारात दररोज चकरा मारत आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी पैसा नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. संपूर्ण खेड्यांचा व गावाचा भार याच शाखेवर आहे. शाखेत अपुरे कर्मचारी असल्याने कामकाज फारच संथ गतीने चालते. कधी लिंक फेल, कधी नेट प्रॉब्लेम तर कधी कर्मचारी रजेवर जात असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप
स्टेट बँक शाखेअंतर्गत असलेल्या एकूण ९ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त २७०० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी केवळ ४०० शेतकºयांना नवीन कर्ज वाटप होणार आहे. मात्र अद्याप केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जाच्या प्रतीक्षेत शेतकºयांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
राजकीय पक्षांची भूमिका गोलमाल
सध्या शेतकºयांना पिकांची डवरणी, निंदण व तणनाशकांच्या फवारणीसाठी पैशाची गरज आहे. पैशाअभावी शेतीचे कामे खोळंबली आहेत. मात्र कर्ज मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची वाट पाहण्याऐवजी शेतकरी सावकारांचे दार ठोठावत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी सेना स्टाईलने आंदोलन छेडण्याच्या पोकळ धमक्या देतात. तर काँग्रेसचे पुढारी केवळ बँक मॅनेजरला निवेदन देत आहेत