ई क्लास जमिनीवरील अतिक्रमणाची नोंद घेण्यासाठी उपोषण
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 24, 2023 06:05 PM2023-08-24T18:05:53+5:302023-08-24T18:06:08+5:30
लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई क्लास गायरान जमिनीवर असणारे दगड, काटेरी झुडपे काढून पडीक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत.
लोणार (बुलढाणा) : तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतमजुरांच्या अतिक्रमणाची अतिक्रमण नोंदवहीत नोंद घ्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २४ ऑगस्टपासून लोणार येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई क्लास गायरान जमिनीवर असणारे दगड, काटेरी झुडपे काढून पडीक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत. या सुपीक जमिनीवर या शेतमजूर, भूमिहीन कष्टकरी कुटुंबांचे तसेच त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, संगोपन व उदरनिर्वाह होतो. अशा सर्व शेतमजूर भूमिहीन असणाऱ्या लोकांनी केलेल्या अतिक्रमित जमिनीची नोंद तलाठी हे अतिक्रमण नोंदवहीत घेत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या अतिक्रमणाची माहिती पोहोचवत नाहीत.
अशा अतिक्रमणांची नोंद अतिक्रमण नोंदवहीत घेण्यास तलाठ्यांना आदेश द्यावे, अशी मागणी ११ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु, अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी युवा शाखेच्या वतीने युवा तालुकाध्यक्ष गौतम गवई, महासचिव पवन अवसरमोल यांच्यासह अतिक्रमणधारकांनी लोणार तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड, तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, दीपक अवसरमोल, नरेंद्र सरदार, रमेश आंधळे, रमेश प्रधान, प्रवीण मोरे उपसरपंच गायखेड, अभिमान मोरे, सर्जेराव मोरे, दामोदर खोटे, विकास मोरे, अक्षय जाधव, जीवन अंभोरे, आकाश प्रधान, मालताबाई साठे, मीना खोटे, आदींसह अतिक्रमणधारक उपस्थित होते.