सूतगिरणी कामगारांचे १५ दिवसांपासून उपोषण
By admin | Published: April 16, 2016 01:53 AM2016-04-16T01:53:57+5:302016-04-16T01:53:57+5:30
मलकापूर येथे सूतगिरणी कामगारांची बंद सुतगिरणी सुरू करण्याची मागणी.
मलकापूर (जि. बुलडाणा): कामगार बांधवांच्या हितास्तव सूतगिरणी वर्कर्स युनियनच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील तहसील चौकात तब्बल १0 दिवस साखळी उपोषण केल्यानंतर आ ता कामगारांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला असून, १५ एप्रिल रोजी त्याचा पाचवा दिवस होता.
गत १५ महिन्यांपासून हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी बंद असल्याने कामगार कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे सदर सूतगिरणी पूर्ववत सुरु करण्यात यावी तसेच बंद काळातील नऊ महिन्यांचा पगार प्रशासकीय आदेशानुसार कामगारांना देण्यात यावा, या मागणीसाठी सूतगिरणी वर्कर्स युनियनच्यावतीने माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युनियनचे अध्यक्ष पुंडलिकराव तायडे यांच्या नेतृत्वात १ ते १0 एप्रिल दरम्यान साखळी उपोषण केले; मात्र न्याय न मिळाल्याने ११ एप्रिलपासून उपोषण बेमुदत करण्यात आले आहे. बेमुदत उपोषणाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. सुभाष खोडके, गजानन बोंद्रे, अनिल देशमुख शशिकांत न्हावी आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राजकीय , सामाजिक क्षेत्रांतून या उपोषणास वाढता पाठिंबा मिळत असून, सूतगिरणी प्रशासनाने या मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.