नळयोजनेचे काम पाहणाऱ्यास पाच वर्षापासून मानधन नाही; जानेफळ ग्रामपंचायतसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:40 PM2018-05-12T18:40:41+5:302018-05-12T18:40:41+5:30
पैसे देण्यास सुद्ध टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध परशराम डोंगरे यांनी जानेफळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ११ मे पासून उपोषणास सुरवात केली आहे.
जानेफळ: नळयोजनेच्या कामावर मानधन तत्वार कार्यरत असताना गेल्या पाच वर्षांपासून पगार देण्यात न आल्याने व नळयोजनेसाठी आणलेल्या साहित्याचे पैसे देण्यास सुद्ध टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध परशराम डोंगरे यांनी जानेफळ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ११ मे पासून उपोषणास सुरवात केली आहे.
येथील परशराम नामदेव डोंगरे हे मे २०१३ पासून जानेफळ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेच्या कामावर मानधन तत्वावर कार्यरत आहेत. या काळात त्यांनी पूर्णवेळ काम करून नळयोजनेसाठी लागणारे साहित्य सुद्धा विकत आणून नळयोजनेसाठी लावलेले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये खंड पडू न देता नियमित पणे गेल्या पाच वर्षापासून नळयोजना सुरू आहे, असे असताना ग्रामपंचायतीकडून मात्र त्यांना मानधन देण्यात आले नाही. त्यांनी नळयोजनेसाठी आणलेल्या साहित्याची रक्कम मिळून ७ लाख ८० हजार रुपये घेणे बाकी असताना देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असल्याने स्वत:च्या कुटूंबासह मुलाच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर आहे. नवीन सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत अवगत करुन सुद्धा त्यांनीही याकडे लक्ष दिले नसल्यामुळे अखेर परशराम डोंगरे यांनी यांनी ११ मे पासून ग्रा.पं. कार्यालयाच्या बाजुला उपोषण सुरू केले आहे. मेहकर पं.स. चे विस्तार अधिकारी सोनुने, प्रभारी ग्रा.वि. अधिकारी डी. आर. आंधळे यांनी उपोषण मंडपास भेट देऊन आपल्या प्रकरणाची लवकरच चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्ते डोंगरे यांनी याला न जुमानता उपोषण सुरुच ठेवले आहे.