दारूचे दुकान हटविण्यासाठी उपोषण
By admin | Published: July 4, 2017 12:11 AM2017-07-04T00:11:49+5:302017-07-04T00:11:49+5:30
बावनबीर: येथील मुख्य रस्त्यावर आणि मध्यवस्तीत असलेले दारूचे दुकान तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बावनबीर: येथील मुख्य रस्त्यावर आणि मध्यवस्तीत असलेले दारूचे दुकान तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दारूचे दुकान गावाबाहेर हटविण्यात यावे, यामागणीसाठी येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना १६ जून रोजी लेखी निवेदन दिले होते. यामध्ये ३ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारपासून ग्रामस्थांसह सरपंच बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
यावेळी सरपंच सरला विजय भगत, हस्नुरबी शे.कहार, विद्या गौतम लहासे, पार्वता काशीराम गव्हाळे, शीला गजानन गायकी, राजेश मुरलीधर तळोकार, गजानन तुळशिराम मनसुटे, रमेश मारोती इलामे, शे. सलीम शे. मुसा तसेच ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
ग्रा.पं.ने घेतला होता ठराव
महिला, नागरिक आणि विद्यार्थ्यांना होणार त्रास पाहता, ग्रामपंचायतने २६ आक्टोबर २०१५ रोजी मासिक सभेत तसेच ४ नोव्हेबर २०१५ रोजी महिला ग्रामसभा आयोजित करुन सदर दारू दुकान गावाबाहेर हटविण्यात यावे, ह्या करिता बहुमताने ठराव मंजूर केला होता. तेव्हापासून ग्रामपंचायत दुकान हटविण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करुन, दुकान मालकास पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला आहे.