रेल्वेस्थानकातील जीवघेणा शॉर्टकट!
By admin | Published: May 22, 2017 12:31 AM2017-05-22T00:31:57+5:302017-05-22T00:31:57+5:30
प्रवाशांसमोर रेल्वे प्रशासनानेही टेकले हात : रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताची शक्यता
फहीम देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात काहींना प्राण गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. तरीही रेल्वेरुळ ओलांडणे थांबत नाही. शेगावच्या रेल्वेस्थानकावरील फलाटावर पोहोचण्यासाठी दादऱ्याचा वापर न करता शॉटकटने जाण्यासाठी रेल्वे रुळाचा वापर अनेक प्रवाशांकडून केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने ही आता या प्रवाशांसमोर हात टेकल्याचे दिसून येते.
शेगाव शहर हे संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले आहे. यामुळे येथे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासठी भारतभरातून भाविक येथे पोचतात. यामुळे शेगाव रेल्वे स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या शहरात येणाऱ्या बहुतांश पॅसेंजर गाड्या येथे खाली होतात व येथूनच भरुन जातात. अशावेळी रेल्वे गाडी पकडण्यासाठी प्रवाशी नेहमीच घाईगडबडीत असतात. त्यामुळे ते दादऱ्याऐवजी रेल्वे रूळ ओलांडत असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे रूळ ओलांडणे तसा कायद्याने गुन्हा आहे. मात्र प्रवाशांनी स्वत:च्याच जीवाशी खेळ चालवला आह़े रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने अनेकांना अपंगत्व येते तर प्रसंगी मरणही. मात्र हे सारे घडत असतानाही प्रवाशी आपल्या जीवाविषयीच बेफिकीर असल्याचे वास्तव शेगाव स्थानकावर दिवसभरात दिसून येत़े.
शेगावच्या स्थानकावर दोनच प्लॅटफार्म आहेत़ प्लॅटफार्मवर एखादी एक्स्प्रेस उभी असल्यास मागावून येणारी गाडी दुसऱ्या प्लॅटफार्मवर घेतली जाते त्यामुळे प्रवासी घाईगर्दीत जिन्याचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडतात़ गाडी पकडण्याच्या नादात मागावून एखादी गाडी येत आहे वा नाही याचीदेखील खातरजमा केली जात नाही त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आह़े अनेकदा तर धावत्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवासी रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याच्या वा पाय कटून अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत़ घरून निघायला उशीर झाल्यास घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडून इच्छीत गाडी पकडताना देखील अनेकदा अपघात झाले आहेत मात्र त्यानंतरही प्रवाशांच्या मानसिकतेत बदल होत नाही़
दिवसभरात किमान ५० वर गाड्या थांबतात तर रेल्वे स्थानकासह परिसरात १००० वर प्रवासी रूळ ओलांडतात़. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे नियमित कारवाई केली जाते तसेच रेल्वेस्थानकावर त्याबाबत लाऊड स्पीकवरून देखील प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन केले जाते, मात्र प्रवासी स्वत:च्याच जीवाविषयी बेफिकीर असल्याचे दिसून येते. रेल्वे अधिनियमात अशा प्रवाशांवर कारवाईची तरतूद आह़े रेल्वे न्यायालयात प्रवाशांवर शंभर रुपयांर्पयत त्यात दंड केला जातो़. शेगाव स्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात प्रवास करतात़ मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडला जात आह़े हा प्रकार म्हणजे थेट जीवाशी खेळण्याचा प्रकार आह़े
रेल्वे प्रशासनासाठी तापदायक
रेल्वे स्थानकात शिरण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत़ प्रवासी वेळ वाचविण्याच्या नादात या शॉर्टकटचा वापर करतात, शिवाय धावती गाडी पकडण्यासाठी वा इच्छित प्लॅटफार्मवर जाण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडले जातात़. मात्र असले शॉर्टकट रेल्वे विभागाला तापदायक ठरत आहे.