रेल्वेफाटकाखालून जीवघेणा प्रवास
By admin | Published: June 16, 2017 07:36 PM2017-06-16T19:36:14+5:302017-06-16T19:36:14+5:30
नांदुरा येथील प्रकार : नागरिकांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ
सुहास वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: येथील रेल्वेफाटकाचे अंतर हे जमिनीपासून जास्त आहे. त्यामुळे येथून वाहने काढणे नागरिकांना सोपे जात आहे. परिणामी कुठलाही विचार न करता नागरिक दुचाकी काढून मोकळे होतात. हा प्रकार नागरिकांच्या स्वत:च्या जिवाशी खेळ करण्यासारखाच असल्याचे बोलल्या जात आहे.
नांदुरा शहरातून मलकापूर-जळगाव जामोदकडे पोच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे यात दुचाकी चालकांची संख्या ही जास्त आहे. पण येथील नागपूर लाईनवरील रेल्वेफाटक प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे, रेल्वे येत आहे की नाही किंवा रेल्वे जवळ आली आहे याचा कुठलाही विचार न करता नागरिक वरूड येथे फाटकाखालून सरळ आपली दुचाकी काढून मोकळे होतात. या फाटकावर अंतर जास्त असल्याने अगदी थोडीशी दुचाकी झुकविली तरी ती बाहेर पडते. यामुळे रेल्वे फाटकाखालून वाहने काढण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. रेल्वे फाटकावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या ठळक अक्षरात थांबा असे लिहिलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता नियमांना तिलांजली देण्याचे काम दुचाकीचालक करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे.