९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:54+5:302021-01-16T04:38:54+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह हाेता. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३.८४ टक्के मतदान झाले हाेते.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापैकी २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर एका ग्रामपंचायतीसाठी नामांकन अर्जच आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ४९८ ग्रामपंचायतींच्या ३ हजार ८९१ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. जिल्हाभरात १ हजार ८०३ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर चाेख बंदाेबस्त हाेता.
सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाली हाेती. मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या हाेत्या. सकाळी ७.३० ते ११.३० दरम्यान जिल्ह्यात १०.२३ टक्के मतदान झाले. त्यानंतर केंद्रावर मतदारांची संख्या वाढली. ११.३० वाजेपर्यंत २८.१८ टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या दाेन तासांत सर्वांत जास्त मतदान मलकापूर तालुक्यात झाले. मतदानाची टक्केवारी १२.३३ हाेती. तसेच सर्वात कमी मतदान नांदुरा तालुक्यात ६.४२ टक्के झाले. दुपारी १.३० वाजेपयर्यंत जिल्ह्यात ४५ टक्के, तर त्यानंतर ३.३० वाजेपर्यंत ६३ टक्क्यांवर पाेहोचले हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र हाेते. तसेच मतदान केंद्रावर चाेख पाेलीस बंदाेबस्त हाेता.
क्वारंटाईन मतदारांसाठी विशेष व्यवस्था
जिल्ह्यातील काेराेना पाॅझिटिव्ह आणि क्वारंटाईन असलेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली हाेती. मतदान करण्याची वेळ सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान हाेती. शेवटच्या एक तासात क्वारंटाईन मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली हाेती. तालुकास्तरावर याविषयी निर्णय घेण्यात आला.
अनेक युवकांनी केले प्रथमच मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक युवकांनी प्रथमच मतदान केले. तसेच वृद्ध, दिव्यांगांनीही मतदानाचा हक्क बजावला.
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर मतदान मास्क न लावता आले हाेते. माेठ्या प्रमाणात रांगा लागल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता. डाेणगाव, बिबीसह अनेक गावांत काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाले.
काही ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड
डाेणगाव येथील दाेन मतदान केंद्रावर इव्हीएममध्ये बिघाड झाला हाेता. तसेच साखरखेर्डा येथे मतदान चिन्ह दिसत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला हाेता. इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.