सर्वसामान्यांच्या नशिबी 'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकविलेल्या आंब्यांचा गोडवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:48+5:302021-05-06T04:36:48+5:30
सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दशहरी, लालपरी, तोतापुरी, पायरी, लंगडा, हापूस, केशर, बादाम आदी विविध ...
सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दशहरी, लालपरी, तोतापुरी, पायरी, लंगडा, हापूस, केशर, बादाम आदी विविध जातीच्या आंब्यांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील मुख्य बाजार गल्लीसह सर्व प्रमुख रस्ते व चौका-चौकात आणि हातगाडीवर विक्री सुरू असलेले हे आंबे बहुतांशी कृत्रिमरीत्या पिकविलेली आहेत. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने नफा मिळविण्यासाठी झटपट आंबे पिकवून ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यावर प्रत्येक व्यापाऱ्याचा भर असून, यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा सर्रास वापर केला जात आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये फळे पिकविण्यासाठी 'कॅल्शिअम कार्बाइड'चा वापर करण्यास मनाई आहे; मात्र नैसर्गिक पद्धतीने फळे पिकविण्यासाठी लागणारा कालावधी व त्या तुलनेत ग्राहकांकडून मिळणारा भाव पाहता तो व्यापाऱ्यांनादेखील परवडणारा नसल्याने अनेक व्यापारी छुप्या पद्धतीने कार्बाइडचा वापर करूनच आंबे पिकवित आहेत.
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांना अधिक भाव!
शहरात अनेकांकडून सध्या नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५० ते ६०० प्रति किलो रुपयांप्रमाणे हे आंबे विक्री होत आहेत. दुसरीकडे कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे १०० ते १२० रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत.
खरेदीपूर्वी जागरूकता महत्त्वाची
कॅल्शियम कार्बाइडने पिकविलेल्या आंब्यांमुळे घसा खवखवणे, जीभ व तोंड येणे, कॅन्सर, किडनीचे विकार, अल्सर, डायरिया, जळजळ आदी आजार होण्याची शक्यता असल्याने अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार यावर बंदी घातलेली आहे. दरम्यान, सध्याच्या काळात आरोग्यविषयक जागरूक असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी आंबे खरेदी करताना आपण आजाराला निमंत्रण तर देत नाही ना! याची काळजी घेणे गरजेचे आहे.
असा ओळखा फरक !
नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी किमान आठ दिवस लागतात. ती दिसायला आकर्षक नसली तरी मनमोहक वास व चव चांगली असते. तर कार्बाइडने केवळ १५ तासात आंबे पिकतात, ती दिसायला पिवळे व आकर्षक असतात; मात्र त्यातून लसणासारखा वास येतो व गरम वाफ निघते.