चार वर्षीय मुलीचा खून करणा-या बापाला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 09:58 PM2018-04-22T21:58:27+5:302018-04-22T21:58:27+5:30
पाच दिवसापूर्वी एका शेतातील विहिरीत पोलिसांना एका चार वर्षीय अनोळखी मुलीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी तपास करुन मृतक चिमुकलीची ओळख पटविली. आणि तिच्या खून करणा-या बापाला अखेर अटक केली.
बुलडाणा - मुलगी नकोशी असणा-या जन्मदात्या बापाने स्वत:च्या मुलीला विहिरीत फेकून खून केल्याची घटना उजेडात आली आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी एका शेतातील विहिरीत पोलिसांना एका चार वर्षीय अनोळखी मुलीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी तपास करुन मृतक चिमुकलीची ओळख पटविली. आणि तिच्या खून करणा-या बापाला अखेर अटक केली.
समाजमन हेलावून सोडणारी घटना पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दितील ग्राम कुंबेफळ येथील आहे. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो देवून पोलिस या मृतक मुलीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांना यश आले आणि मृतक मुलीची अखेर ओळख झाली. चारवर्षीय मृतक चिमुकली ही कुंबेफळ येथील असून तिचे नाव कु.अर्पिता सिध्देश्वर सरोदे असे आहे. कुंबेफळ येथील रहिवाशी आरोपी सिध्देश्वर आत्माराम सरोदे याला तीन मुली व एक मुलगा आहे. त्याचा एक वर्षीय मुलगा लगतच्या काळात मरण पावला आहे. सतत तीन मुली झाल्याने आरोपी सिध्देश्वर सरोदे याने पत्नीला त्रास दिल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. मात्र मुलगा मरणपावल्याने गेल्या १५ दिवसांपूर्वी ती त्याचेकडे आली होती. आरोपी सिध्देश्वर सरोदे याच्या त्रासाला कंटाळून ती भालेगाव येथे आपल्या माहेरी तीन मुलीसह गेली असता अक्षय्यतृतीयेच्या दिवशी आरोपी हा आपली चारवर्षीय मुलगी कु.अर्पिता हिला सोबत घरी घेवून गेला व गावाकडून पिंपळगाव राजा नांदुरा रोडवर सायकलवर बसवून आणले आणि खुश्कर एजाज खान ताहेरअली खान यांचे शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यापूर्वी त्याने तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून घेतले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रथम मर्ग क्र.९/१८ कलम १७४ जा.फौ. प्रमाणे नोंद केली असून ३०२ गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळाची वस्तुस्थिती लक्षात घेता नक्कीच या चारवर्षीय मुलीसोबत घातपात झाल्याची शंका ठाणेदार अहेरकर यांना आली. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवून २२ एप्रिल रोजी मृत मुलीची ओळख पटवून ती कु.अर्पिता सिध्देश्वर सरोदे असल्याची खात्री पोलिसांना झाली. अधिक चौकशी केल्यानंतर मृतक अर्पिताच्या मामा अनंत अंबादास बेलोकार रा.भालेगाव हा पोलिसांसमोर हजर झाला. आणि त्याने कु.अर्पिताची ओळख देवून माझ्या घरुन कु.अर्पिताला तिच्या बापाने अर्थात सिध्देश्वर सरोदे याने नेले होते. तेव्हापासून तो अर्पिताबाबत काहीही माहिती देत नाही असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने संपूर्ण मानव जातीला कलंक लावणारी घटना कथन केली. या बहुचर्चित चिमुकलीच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तिच्या बापाला २२ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला २५ एप्रिल पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली!
मला तीन मुली आहे चौथा मुलगा झाला तो आजाराने मरण पावला. त्यामुळे मला मुलीबद्दल तिरस्कार आहे. त्यामुळे मी कु.अर्पिताचा विहिरीत फेकून देवून खून केला, अशी धक्कादायक माहिती देवून गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी या गुन्ह्याला वाचा फोडून एका निर्दयी पित्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली. या दुर्दैवी घटनेमुळे समाजमने हेलावले आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला फाशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.