गॅस जोडणीधारकांमध्ये रेशनकार्ड रद्द होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 11:45 AM2021-04-04T11:45:06+5:302021-04-04T11:45:49+5:30
Ration Cards News : हमीपत्रात गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिधापत्रिकेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तपासणी मोहिमेदरम्यान रेशनकार्डधारकांकडून हमीपत्र भरून घेण्यात येत आहे. या हमीपत्रात गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याचे नमूद आहे.
यामुळे सर्वसामान्यांमध्ये शिधापित्रका रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शासनाने स्वस्त धान्य दुकादाराकडे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. ‘माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास ही शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे’, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक संभ्रमात असून, गॅस जोडणीधारकांची शिधापत्रिका रद्द होते की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून बहुतांश जणांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणीही आहे. नमुना अर्जात अर्जदाराने त्याच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांची माहिती भरल्यानंतर एक हमीपत्र दिले आहे. हमीपत्राच्या मजकुरात अर्जदार शपथेवर सांगतो की, माझे नावे, तसेच माझ्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावे गॅसजोडणी नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कटंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव करून देण्यात आली आहे, अशा प्रकारचा मजकूर या शिधापत्रिका तपासणी नमुन्यात देण्यात आला आहे.