कोरोनापाठोपाठ आता बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यूची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:51 AM2020-12-04T11:51:21+5:302020-12-04T11:51:32+5:30
Buldhana News कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा धोका वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या साडेअकरा हजारांच्या घरात गेलेली असतााच डेंग्यूचे रुग्णही जिल्ह्यात सापडत आहे. त्यामुळे कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा धोका वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
सध्या जिल्ह्यात डेंग्यूचे १९ रुग्ण असून, डेंग्यूच्या संदर्भाने संवेदनशील भागात सर्वेक्षण करून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येते; मात्र कोरोनापाठोपाठ आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने काळजी घेणे गरजेचे झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मधल्या काळात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण हे लोणार तालुक्यात आढळून आले होते. त्यानंतर नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, अमडापूर आणि मासरूळ परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. संवेदनशील भागावर प्रामुख्याने जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे जिल्ह्यात १८६ जण संदिग्ध रुग्ण आहेत. यात बुलडाणा तालुक्यात ३६, मोताळा तालुक्यात २२, मलकापूर २१, खामगाव तालुक्यातील ३० संशयितांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात निमकवळा, रोहणासह १२ संदिग्ध रुग्ण ऑक्टोबरदरम्यान सापडले होते तर बुलडाणा तालुक्यात हतेडी बु., कुलमखेड, कुंबेफळ, बुलडाणा शहरात सात याप्रमाणे ३६ संशयित रुग्ण आढळून आले होते. मलकापूर तालुक्यात दाताला, मलकापूर येथेही प्रत्येकी सहा संशयित रुग्ण होते. चिखली शहरातही पाच संशयित रुग्ण ऑक्टोबरदरम्यान सापडले होते. लोणार तालुक्यात देऊळगाव कुंडपाळ, वडगाव तेजन, भुमराळा आणि बिबी येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यानंतर तेथे प्रतिबंधक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले होते. दरम्यान, खेर्डा बुद्रुक, केसापूर, पळसखेड जयंतीसह अन्य दोन गावात मलेरियाचेही रुग्ण आढळून आले आहेत.