नागरिक, व्यावसायिकांच्या मनात लॉकडाऊनची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 11:49 AM2021-04-04T11:49:57+5:302021-04-04T11:50:13+5:30
Fear of lockdown : जवळपास सर्वांनाचा लॉकडाऊन नको असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यासह राज्यभरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. येत्या दोन दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. परिणामी आता पूवीसारखा लॉकडाऊन लागला तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल की काय, अशी भिती व्यावसायिक व सर्वांच्याच मनात निर्माण झाली आहे. जवळपास सर्वांनाचा लॉकडाऊन नको असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. विशेषत: बुलडाणा जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. परिणामी हा आकडा रोखायचा असेल तर लॉकडाऊन हाच पर्याय नाही. मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नाही. गर्दीला तर महापूर आला आहे. बुलडाणा, खामगाव, मलकापूर व चिखली शहरासह तालुक्यातदेखील कोरोनाचा कहर होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. आठवडी बाजार बंद असले तरी दैनंदिन बाजारपेठांनी तर गर्दीचा उच्चांक गाठला आहे. अशा गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला आणि लॉकडाऊन लागले तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल, अशी भिती व्यावसायिकांसह नागरिकांना आहे.
संचारबंदीने रोजगारावर गदा
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रात्री ८ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीत बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. मात्र ज्या बाजारपेठांतील विक्रेत्यांचे व्यवसाय लहान आहेत व ज्यांचे हातावर पोट आहेत.
सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ज्यांचा व्यवसाय चांगला होतो, ज्याच्यावर त्यांचे पोट भरते, अशा लहान, किरकोळ वस्तू विकणाºया व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे, अशांनी कसे जगायचे? असा सवाल आता बाजारपेठांतून उपस्थित केला जात आहे.