मृत्यूदर वाढल्याने भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:24+5:302021-04-22T04:35:24+5:30
नवीन कांदा बाजारात बुलडाणा: यंदाचा नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे; परंतु या कांद्याला भाव मिळण्याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार ...
नवीन कांदा बाजारात
बुलडाणा: यंदाचा नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे; परंतु या कांद्याला भाव मिळण्याआधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील नवीन कांदा जपून ठेवावा लागत आहे. या कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
ग्रामीण रस्त्यांची होणार सुधारणा
सिंदखेड राजा: तालुक्यातील माळसावरगाव, धांदरवाडी, चांगेफळ, वर्दडी, धानोरा या रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विद्युत ताराखाली कुटाराच्या गंज्या लावण्यास प्रतिबंध
बुलडाणा: उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. त्यामुळे विद्युत तारांखाली किंवा खांबाजवळ कडबा, कुटाराच्या गंज्या लावू नये, असे आवाहन महावितरण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कपडे सुकवणे, विद्युत पोलला गुरे बांधण्यासह प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
किनगाव राजा: रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांची आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीती निर्माण झाली आहे. परिणामी दोन दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचीच रेमडेसिविरसाठी तारांबळ
बुलडाणा: शासकीय कर्मचाऱ्यांचीच रेमडेसिविरसाठी तारांबळ होत असल्याचा प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अडचणी येत आहेत.
किराणा दुकानासमोर रांगा
मेहकर: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ एप्रिलपासून किराणा दुकानांना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे २१ एप्रिल रोजी किराणा दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
घरोघरी भाजी विक्री सुरू
बुलडाणा: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता भाजीबाजारही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत चौकाचौकात बसून भाजी विक्री करणारे २१ एप्रिलपासून घरोघरी भाजी विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. या कडक निर्बंधामुळे भाजी विक्रेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
‘कृषी संजीवनी’ निधीची लाभार्थ्यांना प्रतीक्षा
लोणार : भूमिहीन शेतमजुरांसाठी पूरक व्यवसाय म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येतो. लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत शेळ्या खरेदी केल्या; मात्र निधीची अद्यापही प्रतीक्षा असल्याने आर्थिक अडचण वाढली आहे.
अमडापूर परिसरात ढगाळ वातावरण
अमडापूर: गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्ह तापण्यास उशिरा सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला होता; परंतु २४ एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
संचारबंदीने केली व्यावसायिकांची पंचाईत
देऊळगाव मही : संचारबंदीमुळे व्यवसाय बंद असल्याने लघू व्यावसायिक व टपरीधारकांची पंचाईत झाली आहे. हातावर पोट असल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्यवसाय बंद, तर घरात पैसे येणे बंद झाले आहे.