अनुदान देण्यास टाळाटाळ केल्याने फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 08:13 PM2019-03-01T20:13:16+5:302019-03-01T20:13:25+5:30
तूर व हरभऱ्याचे धनादेश देण्यास टाळाटाळ केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटन १ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली.
मलकापूर: तूर व हरभऱ्याचे धनादेश देण्यास टाळाटाळ केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना १ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली. सिंदखेड राजा व चिखली परिसरातील शेतकऱ्यांनी गत वर्षभरा पूर्वी नाफेडला स्थानिक ठिकाणी आपली तूर व हरभरा हा माल विक्री केला. माल विक्री करूनही फेडरेशनने चुकारे देण्यास टाळाटाळ करीत विलंब लावला. परिणामत: शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागले.
तर २८ फेब्रुवारी रोजी या उर्वरित २५ शेतक-यांना धनादेश घेण्याकरिता शहरातील बुलढाणा रोड स्थित विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयात बोलविण्यात आले. मात्र अधिका-यांनी पळ काढण्यात व वेळ मारून नेण्यातच धन्यता मानल्याने शेतक-यांनी धनादेश मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला व रात्रीचे १ वाजेपर्यंत या कार्यालयातच तळ ठोकून ठीया दिला. दिवसभर उपाशी राहूनही प्रशासनाला या शेतक-यांची कसलीच कीव आली नाही. उलट कार्यालयीन कर्मचा-यांनी या शेतक-यांना मध्यरात्री बाहेर काढीत कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे शेतक-यांनी संपूर्ण रात्र कार्यालयाबाहेर जागूनच काढली. दिवसभर उपाशी असलेला शेतकरी सकाळी कार्यालयाचे शटर उघडताच कार्यालयात शिरला व धनादेशाची मागणी करू लागला तरीही धनादेश मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने या शेतक-यांनी थेट काँग्रेस नेते तथा नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ व शहर अध्यक्ष राजू पाटील यांच्याशी संपर्क साधित त्यांना आपली व्यथा कथन केली.
शेतक-यांची अडचण लक्षात घेता या दोन्ही पुढा-यांनी तात्काळ विदर्भ कॉपरेटिव्ह फेडरेशनचे कार्यालय गाठले व येथील मॅनेजर संदीप पेठकर यांच्याशी चर्चा करीत तात्काळ चेक वितरित करा अन्यथा आम्हाला तोडफोड करावी लागेल असा धमकी वजा इशारा देत दिला. परिणामत: मॅनेजर पेठकर यांनी नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ व राजू पाटील यांच्या हस्ते त्या शेतक-यांना धनादेश वितरित करण्यात आले. मात्र पुढारी निघून गेल्यावर काही वेळातच सदर धनादेशवर नंबर टाकायचे आहेत व तांत्रिक अडचणी दूर करावयाच्या आहेत, असे कारण सांगत सदर धनादेश फेडरेशन विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या कर्मचा-यांनी परत घेतले. दुपारची सायंकाळ होत असतानाही आज आम्हाला चेक मिळणार की नाहीत असा सवाल शेतक-यांनी उपस्थित करीत पुन:श्च अॅड. हरीश रावळ राजू पाटील यांना बोलावून घेतले. परिस्थिती पाहता पाच तारखेच्या पुढे धनादेश देऊ असे संबंधित अधिका-यांकडून सांगण्यात आल्याने संतप्त पुढा-यांनी शेतकरी हितास्तव या कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत कार्यालयातील संगणक, टेबल, काचा, कुलर, पंखे व खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले.
परंतु जोपर्यंत या शेतक-यांना धनादेश मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका या पुढा-यांनी घेतली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विदर्भ को ऑपरेटिव्हच्या नागपूर स्थित वरिष्ठ अधिकारी निचड यांनी भ्रमणध्वनीद्वारे आंदोलनकर्त्यांनी संवाद साधीत 6 मार्च रोजी सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे धनादेश देऊ, असे आश्वासन दिल्याने पुढारी व शेतकरी बांधवांनी आंदोलन स्थगित केले.