लोकशाहीच्या भिंतीवर उमटणार मतदार राजाची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:23 PM2019-03-27T17:23:10+5:302019-03-27T17:23:45+5:30
बुलडाणा: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दीड हजार लोकशाहीच्या भिंती उभारण्यात येत आहेत.
बुलडाणा: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दीड हजार लोकशाहीच्या भिंती उभारण्यात येत आहेत. निवडणूक विभागाच्या या उपक्रमामुळे मतदार राजांना त्यांची भावना हस्तलिखीत स्वरूपात लोकशाहीच्या भिंतीवर मांडता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात मतदार जनजागृतीसाठी वेगवेळे प्रयोग राबविण्यात येत आहेत. मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचे प्रमाण वाढावे, मतदान प्रक्रियेविषयी मतदार राजांना त्यांचे मत मांडता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘लोकशाहीची भिंत’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार सार्वजनिक ठिकाणी लोकशाहीची भिंत उभारण्यात येत आहे. नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, नव मतदारांच्या विचारांना वाव मिळावा, त्यांच्या मनातील संदेश निवडणूक आयोगापर्यंत पोहचावा, यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरातही लोकशाहीची भिंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत लोकशाहीच्या भिंतीचे उद्घाटन विभागीय आयुक्तांनी त्यावर संदेश लिहून मागील आठवड्यामध्ये केले. तेंव्हा पासून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लोकशाही भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील आठवड्यामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी लोकशाही भिंत हा उपक्रम पोहचणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याठिकाणी लागणार लोकशाहीची भिंत
जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकशाही भिंत उभारण्यात येणार आहे.
नवनवीन ‘स्लोगन’ येणार समोर
लोकशाही भिंतीवर प्रत्येकाला मतदानाविषयी आपला संदेश किंवा मतदार जागृतीचे स्लोगन लिहिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही भिंत या उपक्रमातून ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’!, ‘मतदानाचा अधिकार, लोकशाहीचा आधार’ यासारखे व इतर नवनविन ‘स्लोगन’ समोर येतील.