वारकऱ्यांच्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:03+5:302021-07-20T04:24:03+5:30
विश्वनाथ यमाजी जाधव, श्री संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी ता. देऊळगाव राजा. गेल्या २१ वर्षांपासून मी आषाढी एकादशीनिमित्त नित्यनेमाने ...
विश्वनाथ यमाजी जाधव, श्री संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी ता. देऊळगाव राजा.
गेल्या २१ वर्षांपासून मी आषाढी एकादशीनिमित्त नित्यनेमाने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातो. नियमित वारी करीत आलो आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्ग असल्यामुळे प्रशासनाने संचारबंदी केली. दर्शन, वारीवर निर्बंध घातले. त्यामुळे मी आषाढी एकादशीला घरीच विठुरायाचे पूजन करून दर्शन घेतो. कोरोना महामारीचे लवकरात लवकर समूळ उच्चाटन होवो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
वसंतराव रामभाऊ सोनवणे
सावखेड भोई, ता. देऊळगावराजा.
सिंदखेडराजा गुंज येथून गेल्या ७८ वर्षांपासून वारीची परंपरा जपली जात आहे. परंतु कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून या वारीच्या परंपरेला खंड पडला आहे. माणिकराव ढवळे यांनी सुरू केलेली वारीची परंपरा आम्ही वारकरी जपत आहोत. परंतु या परंपरेत कोरोनाने विघ्न आणले असले तरी, आम्ही घरी राहून विठ्ठलाची पूजन करून आषाढी एकादशीचा सोहळा घराघरात साजरा करणार आहोत.
भागीरथाबाई ढवळे
आषाढी वारीची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे विस्कळीत झाली आहे. वारी ही वारकऱ्यांची पंरपरा नसून ती एक उपासना आहे. दरवर्षी किमान १० लाखापेक्षा अधिक वारकरी वारीला येतात. सर्व वारकरी पंढरपुरात येऊन ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या नामघोषात सर्व पंढरपूर येथे तल्लीन व्हायचे. पण या वर्षी तसा आनंद उपभोगता आला नाही. कोरोनामुळे भाविकांना पांडुरंगाचे दर्शन झाले नाही. आपली वारी आपल्या घरात साजरी करायची आहे.
-सोहम महाराज काकडे, मोळा.