पश्चिम व-हाडातील संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ किडीचा प्रादूर्भाव; संत्राउत्पादक अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:23 PM2017-12-13T13:23:26+5:302017-12-13T13:23:56+5:30
खामगाव : पश्चिम विदर्भातील अर्थकारणाला मोठा हातभार लावणा-या संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ या किडीची लागण झाल्यामुळे संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात ७०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संत्राउत्पादकांचे यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पश्चिम विदर्भातील अर्थकारणाला मोठा हातभार लावणा-या संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ या किडीची लागण झाल्यामुळे संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात ७०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संत्राउत्पादकांचे यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे. सोबतच, साल खाणा-या या अळीमुळे झाडालाच धोका निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरसह अमरावती जिल्ह्यातही याची लागण झाल्याचे समोर येत आहे.
खामगाव उपविभागातील संग्रामपूर तालुक्यासह बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शिटाकळी आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा फळपिकांवर काही ठिकाणी साल खाणारी अळी व फायटोप्योरा रोग आढळून आला आहे. साल खाणारी अळी मुख्यत्वे नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात दिसून येते, त्याचप्रमाणे संत्र्यांच्या जुनाट दुर्लक्षीत बागेत या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच पश्चिम विदर्भातील अनेक संत्रा बागायतीमध्ये फायटोप्योरा रोगाचे सुध्दा प्रमाण वाढले आहे. दरम्यान, दृष्काळी परिस्थिती, वातावरणातील बदलानंतर आता शेतकºयांना विविध कीड रोगांचाही सामना करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात सुमारे ७२ हजार हेक्टरवर संत्र्याची लागवड केली जाते. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड होते. यामध्ये अमरावती, भातकुली, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चिखलदरा, धारणी, दर्यापूर या तालुक्यांच्या समावेश आहे. तर अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यात संत्रा पिक घेतल्या जाते. अकोला जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टरवर संत्रा पिकाची लागवड होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, मेहकर आणि खामगाव तालुक्यातील सुमारे ४ हजार हेक्टरवर तर वाशिम जिल्ह्यात १२०० हेक्टर परिसरात संत्र्याची लागवड होते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम वºहाडातील बहुताशं ठिकाणी साल खाणाºया अळीसोबतच, ‘फायटोप्योरा’ या रोगाची लागण झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या आजाराच्या बचावासाठी कृषी विभागातंर्गत तज्ज्ञांकडून पाहणी केली जात असून विविध उपाययोजना सांगितल्या जात आहेत.
कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम!
दृष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस या पासून बचाव करीत जोपासलेल्या संत्रा पिकाला आता किडीची लागण होत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरीही खचला आहे. दृष्काळी परिस्थितीत कर्जाचा डोंगर करीत मशागत केलेल्या शेतीतून उत्पादनाऐवजी पिकांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात साडे आठशे कोटींची उलाढाल आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दीडशे कोटींच्या जवळपास उलाढालीवर परिणाम जाणवणार असल्याचे संकेत आहेत.
उपाय योजना करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला!
- फायटोप्योराच्या नियंत्रणासाठी संत्रा बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट झाडाच्या खोडाला लावावी, गरज असल्यास या रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील एमझेड ०.२ टक्के किंवा अलाईट ०.२ टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- साल खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी अळीने छिद्र पाडलेल्या भागात केरोसीन, पेट्रोल, मोनोफ्रोटीफ्रास किंवा डायक्लोस्व्हॉस १ टक्के यापैकी एक छिद्रामध्ये सोडून कापसाच्या बोळ्याने छिद्र बंद करावे. आवश्यकता भासल्यास प्रादुर्भावग्रस्त भाग स्वच्छ करुन मोतोफ्रोटोफ्रॉस किंवा ३-५ एमएल डायक्लोरव्हॉस १ टक्के यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी,असा सल्ला कृषी विभागाकडून दिल्या जात आहे.