खत, बियाण्यांचे भाव दुपटीने वाढले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:27+5:302021-05-21T04:36:27+5:30
आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड ...
आधीच कोरोना महामारीने त्रस्त असलेले शेतकरी शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या भुसार मालासह शेतात लागवड केलेला भाजीपालाही कडक निर्बंधामुळे विक्री करता येत नाही. पेरणीपूर्वी शेतीमध्ये मशागतीत शेतकरी गुंतला असून १५ दिवसांनी शेतामध्ये पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी महाग झाले आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. एकीकडे कडक निर्बंधांमुळे पीक कर्ज मिळविण्यास व पीक कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. पीक कर्ज हे पेरणीपूर्वी वेळेवर मिळत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे पेरणीपूर्वी शेतातील ट्रॅक्टरद्वारे कामे करताना डिझेलचे भाव वाढल्याने जास्तीचे पैसे देऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे भाव गगनाला भिडले असून आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने रासायनिक खताचे व कृषी बियाण्यांचे भाव कमी करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.