जानेफळ परिसरात सर्दी, खोकल्यासह तापेचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:44+5:302021-08-22T04:36:44+5:30
सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार ...
सर्दी, खोकला, ताप तसेच हात, पाय दुखणे अशा विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, प्रत्येक घरामागे दोन ते चार जण आजारी पडलेले दिसत आहेत. ज्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, सध्या शेतातील काम धंद्याचे दिवस असताना ते सोडून दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे. अशातच खासगी दवाखान्यातील इंजेक्शन व सलाइनचे दर सुद्धा वाढविण्यात आले असल्याने याचा फटका जनतेला सोसावा लागत आहे. सर्दी व खोकला हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा लगेच फैलाव होत आहे. पावसाळ्यामुळे आलेले नवीन पाणी पचण्यास बाधक ठरत असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांंमधील घाण पाण्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याने ताप व इतर आजारांचे रुग्ण सापडत आहेत. ओपीडी वाढली दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात या आजाराचे प्रमाण बळावत असते. त्यानुसार यावर्षी अल्प पाऊस आणि त्यातच उन्हाळ्याप्रमाणेच असलेले गरमीचे वातावरण हे आरोग्यास बाधक ठरत असल्याने या आजाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयातील ओपीडी वाढली आहे.
रुग्णांनी व जनतेने काळजी घ्यावी : सरपाते
आजारी रुग्णांनी घरगुती उपचार न करतात तज्ज्ञ डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय अशा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा. उपचारात निष्काळजी करू नये. तसेच जनतेने व्हायरल फीवर, जलजन्य आजार, विषाणूजन्य आजार इत्यादीपासून बचावासाठी पाणी उकळून प्यावे. घर, परिसर स्वच्छ ठेवावे आणी डास व मच्छरांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी केले आहे.