क्रीडादिनी चढणार फिफा फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:14 AM2017-08-11T01:14:56+5:302017-08-11T01:15:15+5:30
बुलडाणा : १९ वर्षाखालील फिफा विश्वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या प्रचार- प्रसाराकरिता क्रीडा दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा आयोजित करून विश्वचषकासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : १९ वर्षाखालील फिफा विश्वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या प्रचार- प्रसाराकरिता क्रीडा दिनाचा मुहूर्त शोधण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा आयोजित करून विश्वचषकासाठी वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.
भारतात क्रिकेटचाच बोलबाला असून, अन्य खेळांकडे साहजिकच दुर्लक्ष होते. त्यामुळे फुटबॉल विश्वचषकाबाबत खेळाडूंमध्ये माहिती व्हावी, खेळाडू फुटबॉलकडे वळावे, याकरिता शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिन साजरा केल्या जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शाळेत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शाळा - शाळांमधील फुटबॉल खेळाडू आपआपसात भिडणार आहेत. ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंपर्यंंत विश्वचषकाची माहिती पोहोचावी व त्यांचाही या स्पर्धेला पाठिंबा मिळावा, त्याकरिता शाळास्तरीय स्पर्धा राबविण्यात येत आहे. सध्या संपूर्ण राज्यात फुटबॉलच्या तालुकास्तरीय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धांंमधून विजयी होणारी चमू जिल्हा स्तरावर खेळण्यात येणार्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर विभागीय स्तर व राज्यस्तरावरील स्पर्धा होणार आहेत. राज्यस्तरावरील स्पर्धा पार पडल्यानंतर देशपातळीवर स्पर्धा होणार असून, या स्पर्धतील उत्कृष्ट खेळाडूंची देशाच्या संघात निवड करण्यात येणार आहे. सदर संघ फिफा विश्वचषकात खेळणार आहे.
१४, १७ वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा सुरू
१९ वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धा यावर्षी आक्टोबर महिन्यात भारतात खेळल्या जाणार आहेत. या पृष्ठभुमीवर बुलडाणा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय १४ वषार्खालील व १७ वर्षाखालील खेळाडुंच्या फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत १४ वर्षाखालील ११ संघ, १७ वर्षाखालील ८ संघातील ३४२ खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. तालुका स्तरावरील या फुटबॉल स्पर्धेत जिंकण्याच्या ईर्षेने खेळाडुंनी आपला सहभाग नोंदविला व मैदानावर चुरशीच्या लढती प्रेक्षकांना बघावयास मिळाल्या.
फिफा विष्वचषक स्पर्धेच्या जनजागृतीसाठी राज्यस्तर शाळांमध्ये शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळा शाळांमधील खेळाडू फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामुळे निश्चितच खेळाडूंमध्ये विश्वचषकाबाबत जनजागृती होणार आहे.
- सय्यद दाऊद ,उपप्राचार्य उर्दू हायस्कूल, बुलडाणा