बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथे पंधरा विद्यार्थ्यांना अचानक ग्लानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:21 AM2017-11-28T10:21:21+5:302017-11-28T10:23:37+5:30
रायपूर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर संविधान दिनाच्या कार्यक्रमादरम्यान १५ विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यातील सात विद्यार्थ्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर नऊ विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी: जवळच असलेल्या रायपूर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर संविधान दिनाच्या कार्यक्रमादरम्यान १५ विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यातील सात विद्यार्थ्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर नऊ विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील तीन मुलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील शिवाजी शाळेत संविधान दिनाचा कार्यक्रम २७ नोव्हेंबर रोजी सुरू होता. कार्यक्रमादरम्यान अचानक १५ विद्यार्थ्यांना चक्कर आल्यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यात १३ मुली व २ मुलांचा समावेश आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. शाळेलगतच रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या विद्यार्थ्यांना लगोलग शाळेतील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
यावेळी काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अधिक त्रास होणाºया वैष्णवी संदीप शिरसाट (रा. रायपूर), अंकिता सुनील सरकटे (रा. रायपूर), कोमल गजानन इंगळे या तीन मुलींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, पूजा दिलीप शिरसाट, साक्षी दिलीप लहाने, विवेक पवन घाडगे, हर्षल रमेश घाडगे, पूनम उद्धव चिकटे, ऋतुजा संतोष लहाने, पूनम रमेश सावळे, गीता नारायण सरोदे, पूनम हरिदास सोनुने, निकिता सुनील सरकटे, वैष्णवी नरसिंग चिकटे, स्नेहल संजय चिकटे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले. घटनेतील विद्यार्थ्यांना डोकेदुखी व मळमळ होण्याचा मोठा त्रास होत होता.
हा त्रास सहन न झाल्यामुळे चक्कर येऊन ते पडल्याचे यावेळी उपचार करणाºया डॉक्टरांनी सांगितले.
रायपूर येथील शिवाजी शाळेत १५ विद्यार्थ्यांना उन्हामुळे चक्कर आली, या प्रकाराबाबात शाळेतील शिक्षक काही बोलण्यास तयार नव्हते. शाळा मुख्याध्यापकांबाबत विचारणा केली असता त्याबाबतही शिक्षकांकडून काही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, शाळा मुख्याध्यापकाचा पदभार मानकर यांनी सोडला असल्याचे काहींनी सांगितले.
रुग्णालयात अधिकाºयांची धाव
या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा तहसीलदार सुरेश बगळे, पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेऊन या घटनेची विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून विचारपूस केली तसेच खासगी रुग्णालयात जाऊनही विद्यार्थ्यांची चौकशी त्यांनी केली. सोबतच संबंधितांना विद्यार्थ्यांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रथमदर्शनी सनस्ट्रोकमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांनी चर्चेदरम्यान सांगितले. काही जण सकाळी खाऊन न आल्यामुळे त्यांना हा त्रास झाला असावा, असा कयास आहे. शाळेमध्ये मैदानावर संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू होता. त्या दरम्यान, काही विद्यार्थ्यांना हा त्रास झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन आणि पाच क्रमांकाच्या वॉर्डमध्ये काहींवर उपचार करण्यात येत आहे तर खासगी रुग्णालयात काहींवर उपचार करण्यात येत आहेत. अतिदक्षता विभागातील तिघांचीही प्रकृती सुधारली आहे.
-बी. बी. महामुनी,
उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलडाणा